सौजन्य - नवराष्ट्र टीम
सिग्नल बंद असल्यामुळे संबंधित चौकांतील वाहतूक नियंत्रणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या समस्येबाबत महावितरणशी संपर्क साधून सिग्नलचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी महापालिका करणार आहे. यासाठी महावितरणला ई-मेल पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.
हडपसरपासून येरवड्यापर्यंत परिणाम
हडपसर, कात्रज आणि येरवड्यासह शहराच्या विविध भागांतील चौकांमध्ये सिग्नल बंद पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. मांजरी फाटा, लक्ष्मी कॉलनी, रवी दर्शन, गाडीतळ, हडपसर वेश, मगरपट्टा जंक्शन, वैदुवाडी, रामटेकडी, काळूबाई चौक, सोपान बाग, भैरोबा नाला, लुल्लानगर, महेश सोसायटी, अण्णाभाऊ साठे चौक, मार्केट यार्ड, पुष्पमंगल चौक, पद्मावती चौक आणि कात्रज जकात नाका येथील सिग्नल बंद होते. तसेच अलका चौक, एस. पी. कॉलेज चौक, विनोबा भावे चौक, महात्मा गांधी चौक, आरटीओ चौक, बिशप चौक, येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खराडी जकात नाका, साईनाथनगर, गोल्फ चौक आणि विश्रांतवाडी चौकासह अन्य ठिकाणच्या सिग्नलचाही यामध्ये समावेश आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण आणि पुणे महापालिकेने अलीकडेच बसविलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ४६ वाहतूक सिग्नलचा वीजपुरवठा आपोआप बंद झाला. त्यापैकी सहा सिग्नल सुरू करण्यात आले असून, उर्वरित ४० सिग्नल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आणि महावितरणचे मुख्य अभियंते ही समस्या दूर करण्यासाठी काम करीत आहेत. सर्व सिग्नलचा वीजपुरवठा लवकरच पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.
६०० पोलिस नियुक्त
सिग्नल व्यवस्था अचानक कोलमोडल्यामुळे पोलिसांची देखील चांगलीच धावपळ उडाली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी वाहतूक पोलिसांसह अतिरीक्त ६०० पोलिस तैनात केले होते. सिग्नल बंद असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले. त्यामुळे पोलिसांवर अचानक झालेल्या सिग्नलचा गोंधळाचा ताण पडला.






