
पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील 'ही' दोन नावे चर्चेत
महापालिकेच्या सध्याच्या संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २७ नगरसेवकांसह सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरतो. काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) केवळ ३ जागांवर मर्यादित राहिला आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी अजित पवार गट आणि शरद पवार गट युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे हे दोन्ही गट सभागृहात एकत्र राहतील, अशी चर्चा आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एकमेव नगरसेवक सभागृहात असणार आहे. या सर्व राजकीय समीकरणांचा विचार करता विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, राज्याच्या सत्तेत भाजप आणि अजित पवार गट एकत्र असल्याने प्रत्यक्ष विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका काँग्रेसलाच निभवावी लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद जरी राष्ट्रवादीकडे गेले, तरी प्रत्यक्षात विरोधी सूर किती तीव्र राहील, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन प्रमुख नावे चर्चेत आहेत. यामध्ये अनुभवी आणि सभागृहाच्या कामकाजाची सखोल माहिती असलेले नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे नाव आघाडीवर आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सभागृहातील दीर्घ अनुभव आणि आक्रमक शैली ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. भाजपच्या प्रचंड संख्याबळासमोर विरोधी पक्षाने ठाम आणि आक्रमक भूमिका घ्यावी लागणार असल्याने चांदेरे यांचा अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, नगरसेवक निलेश निकम यांचे नावही चर्चेत आहे. पाचव्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून काम पाहणारे निकम हे अनुभवी चेहरा आहेत. त्यांचा स्वभाव तुलनेने शांत आणि संयमी असल्याची ओळख आहे. मात्र, दीर्घ अनुभव आणि कामकाजातील सुस्पष्टता यामुळे
तेही पक्षासाठी सुरक्षित पर्याय मानले जात आहेत. भाजपच्या ११९ जागांच्या भक्कम संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेता आक्रमक असावा, अशी अपेक्षा असली तरी, सभागृहातील सुसंवाद आणि मुद्देसूद मांडणीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.