
‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’ला पूर्ण झाली 50 वर्षे
चळवळीचा पुण्यातील विस्तार हळूहळू वाढला
दररोज सकाळी व सायंकाळी नियमित बैठका
सुनयना सोनवणे / पुणे: कर्जाचा डोंगर, व्यसनाचे विळखे आणि उद्ध्वस्त होत चाललेले कौटुंबिक आयुष्य… अशा अंधकारमय परिस्थितीतून बाहेर पडलेल्या असंख्य जणांसाठी आशेचा किरण ठरलेली ‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’ (ए.ए.) ही स्व-मदत चळवळ पुण्यात आपल्या कार्याच्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवात प्रवेश करत आहे. व्यसनमुक्तीच्या प्रवासात हजारो कुटुंबांना आधार देणाऱ्या या चळवळीचा पुण्यातील पाया ४ जुलै १९७६ रोजी रचला गेला होता.
अमेरिकेत १९३५ मध्ये सुरू झालेल्या या चळवळीचा पुण्यातील विस्तार हळूहळू होत गेला. कॅम्प परिसरातील अर्नेला हायस्कूलमध्ये झालेल्या पहिल्या सभेत सुरुवातीला केवळ एक व्यक्ती उपस्थित राहत असे. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परस्पर अनुभवांच्या देवाणघेवाणीतून ही चळवळ आज शहरातील ४० ते ४२ समूहांपर्यंत पोहोचली आहे. कोथरूड, डेक्कन, विश्रांतवाडी, कर्वेनगर, खडकी, बाणेर, बावधन आदी भागांत दररोज सकाळी व सायंकाळी नियमित बैठका घेतल्या जातात.
ए.ए.ची कार्यपद्धती पूर्णतः स्व-मदत तत्त्वावर आधारित असून येथे कोणतेही औषधोपचार, शुल्क किंवा बंधने नसतात. सदस्य आपले अनुभव मोकळेपणाने शेअर करतात आणि त्यातूनच इतरांना व्यसनमुक्तीची प्रेरणा मिळते. ‘एक व्यसनमुक्त व्यक्ती दुसऱ्या व्यसनाधीनाला हात देऊन उभे करते’ हे या चळवळीचे मूलभूत तत्त्व मानले जाते.
पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज; महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
‘दारूमुळे माझे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक प्रयत्न करूनही व्यसन सुटत नव्हते. मात्र ए.ए.च्या बैठकीत गेल्यानंतर माझ्यासारख्यांचे अनुभव ऐकून मला नव्या आयुष्याची दिशा मिळाली,’ असे अनुभव व्यसनमुक्त झालेल्या सदस्यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्ती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलिझम हा एक आजार असून त्यावर सततचा मानसिक आधार आणि समूहाची साथ हीच प्रभावी उपचारपद्धती ठरते. शहरातील विविध भागांत विनामूल्य बैठका सुरू असून, ‘नवे आयुष्य शक्य आहे’ हा विश्वास या चळवळीने गेल्या ५० वर्षांत दृढ केला आहे.
पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी ‘टेहळणी टॉवर’ उभारणार; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
रविवारी सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम –
५ जुलै रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १ या वेळेत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ए.ए.चे कार्य, व्यसनमुक्तीचा अनुभव तसेच व्यावसायिक क्षेत्रातील सहकार्याची भूमिका यावर सविस्तर सादरीकरण होणार आहे. व्यावसायिक, समुपदेशक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असून, व्यसनाधीन व्यक्तींपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी ए.ए. एक प्रभावी माध्यम ठरू शकते, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.