
पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
सासवड /संभाजी महामुनी : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा आहारातील वाटाणा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आंबेगावमधील प्रकरण ताजे असताना पुरंदर तालुक्यातील अंगणवाड्यांना दिला जाणारा वाटाणा त्याच प्रतीचा असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नाही, तर अंगणवाडी सेविकांनी पुरंदर पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आहाराबाबत तालुका प्रशासन किती गंभीर आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आंबेगाव तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेने लहान मुलांना आहारात दिले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे सोशेल मिडीयावरून सांगितले. तसेच अन्न पुरवठा विभागाने यावर कारवाई करण्याचे आवाहन केले होते. सोशेल मिडीयावर याबाबतचा व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. राज्य शासनाने अंगणवाडी सेविकेची दखल घेत साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराचा परवाना काढून घेणे अपेक्षित असताना महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले. पुणे जिल्हा परिषद आणि राज्य शासनावर सर्व बाजूने हल्ला झाल्यानंतर जिल्हा परिषदेने संबंधित अंगणवाडी सेविकेचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले.
या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या साहित्याची पाहणी केली असता संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याचे आढळून आले. तसेच याबाबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना माहिती विचारली असता त्यांनी अनेक दिवसापासून आहाराचे साहित्य निकृष्ट दर्जाचे येत असून आहारात देण्यात येणारा वाटाणा अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगितले. कित्येक तास पाण्यात भिजायला घातला तरी पूर्णपणे भिजत नाही तोच वाटाणा मुलांना आहारात नाईलाजास्तव द्यावा लागतो. याबाबत पालकांनाही अनेकवेळा माहिती दिली मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली
मुलांच्या आरोग्यावर परिणाम
तालुका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अनेकवेळा लेखी पत्राद्वारे आहारातील वाटाणा निकृष्ट असून मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने तातडीने बदलून देण्याची मागणी केली. मात्र या कार्यालयाकडूनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही. अधिकारी आमची कोणतीही दखल घेत नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. याबाबत पुरंदर तालुका पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांच्याशी संपर्क केला असता सुरुवातीला त्यांनी पुरंदर मधील आहाराचे साहित्य चांगले असून वाटाणा चांगल्या प्रतीचा असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्याकडे अंगणवाडी सेविकांनी लेखी पत्र देवून वाटांना बदलून देण्याची मागणी केल्याची आठवण करून देताच भानावर आलेल्या अधिकाऱ्यांनी आपण याबाबत जिल्हा परिषदेला कळविले असल्याचे सांगून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.
पांढरा निकृष्ट वाटाणा परत जमा करण्यात येणार : अनिल कांबळे
पुरंदर तालुक्यातील अंगणवाडीमध्ये आहारासाठी दिला जाणारा वाटाणा निकृष्ट असल्याचे समोर आले असून आपण ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पांढऱ्या रंगाचा वाटाणा भिजत नसल्याने तो परत घेतला जाणार असून त्याऐवजी हिरव्या रंगाचा वाटाणा पुरविणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पांढरा निकृष्ट वाटाणा आहे त्यांनी तालुका प्रशासनाला कळवावे त्यांना तातडीने हिरवा वाटाणा बदलून देण्यात येईल. अशी माहिती पुरंदर पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी दिली आहे.
पंचायत समितीचे सभापती माहितीपासून अद्याप दूरच
पुरंदर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी लेखी पत्राद्वारे वाटाणा निकृष्ट असल्याचे सांगितले आहे. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनीही निकृष्ट वाटांना परत घेणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तालुक्यात कोठेही निकृष्ट वाटाणा नसून चांगल्या प्रतीचा असल्याचे सांगितले आहे. यावरूनच सभापतीं विविध विभागांच्या वस्तुनिष्ठ माहितीपासून अद्याप दूरच असल्याचे दिसून आले आहे.