दिवे घाटात कोसळली दरड (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: वारीच्या सोहळ्यात पुण्यातील पालखी मार्गाचे विशेष महत्व आहे. दरम्यान दिवे घाट हा पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर महत्वाचा असा घाट आहे. दरम्यान पंढरपूर पालखी महामार्गवरील कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेला निष्काळजीपणा आज अनेकांच्या जीवावर बेतता बेतता राहिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिवे घाटाच्या डागडुजीबाबत ओरड येत होती. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. त्याचाच परिणाम म्हणून आज सायंकाळी गर्दीच्या वेळी घाटात मोठी दरड कोसळली आहे. डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने दरड कोसळली असल्याचे म्हटले जात आहे.
आज सायंकाळी गर्दीच्या वेळी घाटात मोठी दरड कोसळली. सुदैवाने त्यावेळी घटनास्थळाजवळून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरड कोसळल्यानंतर घाटात आलेल्या मोठमोठल्या दगडांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. घटनेनंतर पोलीस बराच वेळ पोहचू न शकल्याने नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.