संग्रहित फोटो
मंचर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ४ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ या उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. याचा थेट लाभ जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदानित प्रात्यक्षिक संच देण्यात येणार आहेत. तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरणासह नवीन शेततळी उभारण्यात येतील. जुन्या शेततळ्यांना प्लास्टिक अस्तरीकरण तसेच सुरक्षिततेसाठी कुंपण करण्याची कामेही केली जाणार आहेत. या निधीसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रशासकीय मान्यतेचे आदेश व शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यात यापूर्वी न्यूक्लिअस अर्थसंकल्पातून स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला. या निर्णयामुळे चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना पारंपरिक शेतीसोबत नगदी पिकांचा पर्याय मिळावा आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण व्हावी, हा या योजनेचा उद्देश आहे. स्ट्रॉबेरी लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला निश्चितच चालना मिळेल. -दिलीप वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष.
आंबेगावच्या रस्त्यांसाठी ६ कोटी २५ लाखांचा निधी
आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अधिक मजबूत व सुरक्षित करण्यासाठी ‘३०५४ रस्ते विकास व मजबुतीकरण’ लेखाशीर्षांतर्गत सन २०२६-२७ मधील ११ विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या निधीतून अवसरी खुर्द, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, म्हाळुंगे पडवळ आणि निरगुडसर या गावांतील अंतर्गत तसेच जोडरस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. अवसरी खुर्द येथील तीन कामांसाठी १ कोटी ४५ लाख रुपये,पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील तीन कामांसाठी २ कोटी ८५ लाख रुपये, म्हाळुंगे पडवळ येथील चार कामांसाठी १ कोटी २५ लाख रुपये, तर निरगुडसर येथील एका रस्त्यासाठी ७० लाख रुपये रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.






