(फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणेः मराठवाड्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास या भागात अनुशेष होता. मागील काही वर्षांमध्ये तो भरून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. विकासाच्या दृष्टीने हा भाग मागे राहिला असला तरी तेथे गुणवंताची कमी नाही असे मत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले. ‘मराठवाडा समन्वय समिती’तर्फे ‘मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, पदाधिकारी किशोर पिंगळीकर, दत्ता म्हेत्रे उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील भूमीपुत्रांना ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलघोडे, एमआयटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुनिता कराड, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवृत्त कृषी संचालक रामकृष्ण मुळे, हायटेक सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वाघमारे यांना पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
प्रशासनातील पदावर गेल्यानंतर अहंभाव निर्माण होतो
यावेळी बोलताना चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, शासन प्रशासन चुकत असल्यास आपण बोट दाखवायला हवे. आज दुर्दैवाने प्रशासनातील एखाद्या पदावर गेल्यानंतर त्याच्यामध्ये अहंभाव निर्माण होतो. अधिकाऱ्यांनी त्या पदावर असताना आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे याचे भान ठेवायला हवे. प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी राज्य समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन काम करायला हवे.पुणे किंवा इतर कोणत्याही शहराच्या परिसरात असलेल्या सर्व नद्या विषयुक्त झाल्याची परिस्थिती आहे. आपण घरातील, शहरातील, परिसरातील घाण काढून ते सार्वजनिक ठिकाणी फेकून देत आहोत. त्याचे योग्य विल्हेवाट न लावणे हे दुःखद आहे.
विविध क्षेत्रातील बदलासाठी ग्रंथाची भूमिका महत्त्वाची
वेगवेगळ्या क्षेत्रात बदल करायचा असल्यास त्यामागे महत्त्वाची भूमिका ही ग्रंथांची आहे. मात्र आत्ताची पिढी छापील पुस्तके वाचायचे विसरत चालली आहे. त्यांच्यावर वाचनाची संस्कृती बिंबवण्यासाठी काम कराव लागणार आहे, अन्यथा हे पिढी दिशाहीन झाल्यानंतर आपले काही खरं नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की, अत्यंत सहिष्णु असलेला भारतीय समाज आता कधी नव्हे तो जातीपातीचा भिंती मजबूत करून एकमेकांविषयी द्वेष वाढवत असल्याचे पहावयास मिळत आहे.
राज्यघटना फक्त मिरवण्याची बाब नव्हे
आपली राज्यघटना अतिशय सुंदर सहज भाषेत लिहिलेली आणि प्रचंड माननीय मूल्य असलेली आहे. ती फक्त पुस्तक म्हणून मिरवण्याचा गोष्ट नाही, ती समजून घेतली पाहिजे, वाचली पाहिजे, तिचा अंगीकार केला पाहिजे, तरच आपल्या समाजात वाढत चाललेली दरी दूर व्हायला मदत होणार आहे असे मत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.
साहित्यिक बाबा भांड म्हणाले, ”मराठवाड्याच्या स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला. शिक्षकांनी आमच्यावर संस्कार केले. प्र. के. अत्रे यांचे पुस्तक वाचून लेखनाकडे वळलो, त्यानंतर माझे गुरू भालचंद्र नेमाडे यांनी माझ्या लेखनाला बळ दिले. वाचन व लेखनाने आम्हाला घडविले. लेखन हे सांस्कृतिक जबाबदारी असल्याचे भान नेमाडे यांच्यामुळे मला मिळाले.”