अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या (File Photo : Farmer Suicide)
संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, विशेषतः मराठवाड्यात ही परिस्थिती आणखी भयाण आहे. राज्यात तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. तसेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील याच कालावधीतील 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पीकविम्याची प्रतिक्षा, कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा हे संकटांच्या साखळीत अडकलेले शेतकरी शेवटी आयुष्यच संपवतात.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड जिल्हा सर्वाधिक आत्महत्या नोंदवलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते जून २०२५ दरम्यान बीडमध्ये तब्बल १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १०१ होती.
373 कुटुंबांना मदत, 200 कुटुंब अपात्र
पीक नुकसान, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून किंवा परवानाधारक सावकारांकडून कर्ज फेडण्यास असमर्थता, वाढत्या कर्जामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या आर्थिक मदतीसाठी पात्र मानल्या जातात. अशा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये दिले जातात. राज्यभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३७३ कुटुंबे आर्थिक भरपाईसाठी पात्र असल्याचे आढळून आले. तर २०० कुटुंबांना अपात्र घोषित करण्यात आले, असे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रासाठी बिकट प्रश्न
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रासाठी एक बिकट प्रश्न बनत आहे. आपल्या राज्याला पुरोगामी राज्य म्हटले जाते. जेव्हा शेतकरी प्रत्येक बाबतीत हताश आणि असहाय्य होतो, तेव्हाच तो असे धोकादायक पाऊल उचलतो. जानेवारी 2015 ते मार्च 2019 पर्यंत महाराष्ट्रात 12,616 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2023 पर्यंत, राज्यात दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करतात. गेल्या आठवड्यात, विदर्भातील कैलाश अर्जुन नागरे नावाच्या तरुण आणि होतकरु शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.