फोटो सौजन्य - Social Media
भारत सरकारच्या मालकीची असलेली नवरत्न कंपनी एनएचपीसी लिमिटेड (NHPC Limited) ही देशातील अग्रगण्य जलविद्युत निर्मिती करणारी कंपनी असून जल, सौर, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या प्रकल्पांमध्येही कार्यरत आहे. कंपनीने नुकतीच नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून यामध्ये एकूण २४८ पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीमध्ये असिस्टंट राजभाषा ऑफिसरसाठी ११ पदे, ज्युनिअर इंजिनिअरसाठी (सिव्हिल १०९ पदे, इलेक्ट्रिकल ४६, मेकॅनिकल ४९, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन १७ पदे), सीनिअर अकाउंटंटसाठी १० पदे, सुपरवायझर (आयटी)साठी १ पद, तसेच हिंदी ट्रान्सलेटरसाठी ५ पदे यांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी पदव्युत्तर (हिंदी/इंग्रजी), इंटर सीए/सीएमए, डिप्लोमा (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन) तसेच बीसीए/बीएस्सी (आयटी) अशा अर्हता मागवण्यात आल्या आहेत. काही पदांसाठी आवश्यक अनुभवाची अट देखील ठेवण्यात आली आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून १ ऑक्टोबर २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर nhpcindia.com या Career Section मध्ये भेट द्यावी लागणार आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करताना उमेदवारांनी आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, सही आणि संबंधित शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ७०८ रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क नाही.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ ऑक्टोबर २०२५ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांनुसार राखीव वर्गांना सवलत देण्यात येईल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यांच्या आधारे केली जाणार आहे.
एनएचपीसी ही जलविद्युत प्रकल्पांबरोबरच सौर, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात सक्रिय असल्याने उमेदवारांना दीर्घकालीन व स्थिर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी या भरतीतून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी नियोजित मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.