सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : सध्या गणेशोत्सव सुरु असून गणेशोत्सव बरोबरच आगामी काळातील पितृ पंधरवडा, नवरात्र उत्सव आणि दिवाळी या प्रमुख सणांत फुलांना मोठी मागणी असते. फुलांची गरज आणि मागणी लक्षात घेवून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. आता फुलांची तोडणी सुरु असून बाजारात आवक बरोबरच मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तरीही अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसून त्यातून खर्च कसा निघणार ? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित राहिला आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही उत्पन्न मात्र मनासारखे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुरंदर तालुक्यात विविध सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी गुलाब, जरबेरा, मोगरा, तसेच झेंडूच्या विविध जातींचे फुले, बिजली, कापरी अशा फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. यंदा शेतकऱ्यांवर निसर्गाने अवकृपा केली असून कमी पावसामुळे खरीपातील पिके जागविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके हातात आणली आहेत. कमी पाण्यावर मोठ्या कष्टाने पिके डौलदारपणे उभी आहेत. काही ठिकाणी बाजरीला कणसे लागण्याच्या तयारीत आहेत तर कापरी, झेंडू, बिजली, तेरडा या फुलांची सर्वत्र तोडणी सुरु आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर नीचांकी भाव
शेतकरी शेतामध्ये विविध फुलांची तोडणी करताना दिसून येत आहेत. गणेशोत्सव सुरु असल्याने फुलांना चांगला भाव मिळेल आणि त्यापासून चांगले उत्पन्न निघेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र बाजारातील परिस्थिती वेगळीच असून अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव मिळत असल्याने खर्च निघेल की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात झेंडू तसेच इतर फुलांना प्रती किलोला किमान १०० रुपयांचा बाजारभाव मिळत असतो. मात्र यंदा ५० रुपये सुद्धा किलोला मिळत नाही. गणेशोत्सव अगदी तोंडावर असताना २० ते ३० रुपये एवढा नीचांकी भाव मिळत होता. त्यामध्ये २० ते ३० रुपयांचीच वाढ होवून साधारणपणे ५० ते ६० रुपये प्रती किलो एवढा भाव मिळत आहे.
उत्पादन खर्चही निघेना
मात्र शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, आजपर्यंत केलेला खर्च, फुलांच्या लागणीपासून तोडणी आणि बाजार मध्ये नेण्याच्या खर्चाचा हिशेब केल्यास त्यामध्ये काहीच परवडत नाही असे दिसून येत आहे. फुलांची तोडणी परवडावी आणि चार रुपये राहावे यासाठी अनेक शेतकरी घरच्या घरीच काम करीत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना बाहेरून मजूर बोलवावे लागत आहेत. एका मजुराला किमान ३०० रुपये पगार दिला जातो. त्यामुळे दिवसभर पाच व्यक्तींनी दिवसभर फुले तोडल्यावर त्यापासून येणारे उत्पन्न आल्यावर खर्चही निघत नाही. त्यामुळे किमान ८० ते १०० रुपये तरी भाव मिळाला पाहिजे तरच खर्च निघेल अशी भावना फुल उत्पादक शेतकरी मधुकर कुंभारकर यांनी व्यक्त केली आहे.






