संग्रहित फोटो
लोणी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात मारहाणीच्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता लोणी येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर चाकू, तलवार व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे. गणेश उर्फ विकी आण्णासाहेब राक्षे (वय २८, रा. वेताळबाबा चौक, लोणी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या चौकशीत गुन्ह्यातील अन्य सात साथीदार निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री नागेश लोट हे मोटारसायकलवरून घरी जात असताना ब्राम्हणे वस्ती येथे दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर चाकू, तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात व पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
समांतर तपास करीत गुन्हे शाखेला आले यश
या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना १६ सप्टेंबर रोजी विकी राक्षे हा लोणी येथील जनावरांच्या बाजारात क्रेटा वाहनात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हल्ल्यात सहभाग असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी पोलिस करीत आहेत.
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.






