
कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाच्या संभाव्य मार्गरेषेविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, बनकरफाटा येथे १६ गावांतील शेतकरी व नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. ‘लातूर जनकल्याण मार्ग हटवा, शेतकरी बचाव’ आणि ‘आमच्या तालुक्यातून हा मार्ग नकोच’ अशा भूमिकेतून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रस्तावित महामार्गामुळे सुपीक शेतजमिनी, घरे, विहिरी, बोअरवेल, फळबागा, पारंपरिक रस्ते आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर संभाव्य परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जुन्नर तालुका प्रस्तावित मार्गातून वगळावा, तसेच शासनाने प्रकल्पाची अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.
कल्याण–लातूर महामार्गाच्या प्रस्तावित संरेखनामुळे कोणत्या गावांतील किती जमीन बाधित होणार, कोणत्या शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि प्रकल्पाची सध्याची प्रशासकीय स्थिती काय आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली. महामार्गाच्या मार्गरेषेबाबत स्थानिक पातळीवर विविध चर्चा सुरू असल्या, तरी अंतिम संरेखन नकाशा, बाधित क्षेत्राचा तपशील आणि भूसंपादनाच्या वैधानिक प्रक्रियेची अधिकृत स्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
प्रस्तावित कल्याण–लातूर महामार्गाची लांबी सुमारे ४५० किलोमीटर असून, तो ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतून जाण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. महामार्गाचे संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या अधिकृत निर्णयाची आणि स्थानिक मार्गरेषेची माहिती मागितली जात आहे. कृती समितीचे कार्याध्यक्ष सुरज वाजगे यांनी प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, घरे आणि विहिरींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. अनेक वर्षांच्या कष्टातून उभी केलेली शेती, फळबागा आणि निवासस्थाने बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा, प्रस्तावित मार्गरेषेची अधिकृत माहिती द्यावी आणि संभाव्य बाधित क्षेत्राचा तपशील स्पष्ट करावा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी नेते अंबादास हांडे यांनी जुन्नर तालुक्यातील यापूर्वीच्या तसेच प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांचा संदर्भ देत शेतजमिनींच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. पिंपळगाव जोगा धरण, डावा कालवा, रस्ते रुंदीकरण आणि प्रस्तावित कल्याण–लातूर महामार्ग यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींवर परिणाम होण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, मार्गरेषेचा पुनर्विचार करावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
कल्याण–लातूर जनकल्याण महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून बाधित गावांतील शेतकरी व नागरिकांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तळेरान, मढ, पारगाव, शेतीवाडी, बागडवाडी, वाटखळ, कोळवाडी, कोल्हेवाडी, सांगणारे, कोटमवाडी, पिंपळगाव जोगा, डिंगोरे, उदापूर, अहिनवेवाडी, ओतूर आणि रोहोकडी या गावांतील संभाव्य परिणामांबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या नेतृत्वाखाली बाधित गावांतील शेतकऱ्यांची समिती स्थापन करण्यात आल्याचे आंदोलनस्थळी सांगण्यात आले. आंदोलनासोबतच प्रशासनाकडे निवेदने देणे, प्रकल्पाशी संबंधित अधिकृत कागदपत्रे मागविणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे, अशी भूमिका समितीने घेतल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, जलस्रोत आणि स्थानिक जीवनपद्धतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करून शेतकऱ्यांची बाजू संबंधित विभागांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले.
माजी आमदार अतुल बेनके यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे सांगितले. प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रशासकीय हालचालींबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच एमएसआरडीसीचे प्रमुख अनिल गायकवाड यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त
दरम्यान, बनकरफाटा येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आंदोलनात जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, बाळासाहेब दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबन तांबे, देवराम लांडे, सुरज वाजगे, अंबादास हांडे, भगवान घोलप, बापूसाहेब कुमकर, ईश्वर केदारी, रामदास घोलप, शिवशंकर घोलप, पंकज घोलप, निलेश घोलप, अमोल घोलप, सचिन घोलप, विकास राऊत, विनोद केदारी, दत्तात्रय डुंबरे, पंकज हांडे, मंदाकिनी दांगट, संतोष घोटणे, यांच्यासह शेतकरी व महिला उपस्थित होते.