संग्रहित फोटो
पिंपरी : चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने पत्नीला शिवीगाळ करून दगडाचा खलबत्ता डोक्यात, तर बत्ता तोंडावर मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना थेरगावात घडली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सृष्टी महादु सोनवणे (वय २४, रा. गुरुनानक कॉलनी, थेरगाव, मूळ रा. अहमदपूर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून महादु विनायक सोनवणे (वय ३१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गुरुनानक कॉलनीतील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादु सोनवणे हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने पत्नी सृष्टी यांच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने सृष्टी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर घरातील दगडाचा खलबत्ता त्यांच्या डोक्यात मारला, तसेच खलबत्त्याचा बत्ता तोंडावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे, तर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सृष्टी यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.






