पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा. येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची आज पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घेण्यात याव्या त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या वास्तुचं अद्यापही संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करण्यात आलेली नाही. ही वास्तू तातडीने स्मारकात रुपांतरीत करणं आवश्यक आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघालेला नाही.
इतकच नव्हे ज्या भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा भरली त्या शाळेची अवस्था बघून सामान्य माणसाला लाज वाटेल अशी झाली आहे. असं असलं तरी सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी मात्र, समाज सुधारकांचे पुतळे बांधण्यातच व्यस्त आहेत.






