मोदकांच्या गोडव्याने छोट्या व्यवसायाला बळ
घरच्या घरी मोदक तयार करून विक्री करणाऱ्या महिला आणि कुटुंबांनी गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. सकाळपासून मोदक तयार करणे, त्यांची पॅकिंग करणे आणि मंडळांच्या परिसरात विक्रीसाठी आणणे, असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी भाविक दर्शनानंतर प्रसादासाठी मोदक खरेदी करत आहेत. त्यामुळे मोठ्या दुकानांबरोबरच घरगुती विक्रेत्यांच्या हातालाही या दहा दिवसांत चांगले काम मिळत आहे.
विशेष म्हणजे, मंडळांच्या परिसरात भाविकांची सतत वर्दळ असल्याने ग्राहक शोधण्यासाठी स्वतंत्र जाहिरातीची गरज या विक्रेत्यांना भासत नाही. ‘दर्शनासाठी आलेला भाविक आणि प्रसादासाठी मोदक’ हे गणेशोत्सवातील समीकरण त्यांच्या व्यवसायाला हातभार लावत आहे. काही विक्रेते सकाळच्या गर्दीपूर्वीच मोदक तयार करून आणत असून, मागणी वाढल्यास दिवसभरात पुन्हा मोदक बनविले जात आहेत.
यंदा कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मोदकांच्या किमतीत वाढ झाली असली तरी मागणीवर त्याचा मोठा परिणाम झालेला नाही. पुण्यात यंदा उकडीच्या मोदकाचा दर साधारण ३० ते ५० रुपये प्रतिनग आहे. त्यामुळे दहा, वीस किंवा त्यापेक्षा अधिक मोदकांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे छोट्या विक्रेत्यांच्या रोजच्या उलाढालीला चालना मिळत आहे.
‘घरच्या चवीचा मोदक’ हीच या विक्रीची खासियत ठरत आहे. आजी-आईकडून शिकलेली पाककृती, ताजे साहित्य आणि मागणीनुसार तयार केलेले मोदक यामुळे भाविकही मंडळाबाहेरील या छोट्या विक्रेत्यांकडून आवर्जून खरेदी करत आहेत. परिणामी, बाप्पाच्या उत्सवात प्रसादाचा मोदक अनेक कुटुंबांसाठी उत्पन्नाचे दहा दिवसांचे साधन ठरत आहे.
गणपतीच्या दिवसांत मंडळाच्या परिसरात ग्राहक सहज मिळतात. घरातूनच मोदक तयार करून आणतो. दर्शनासाठी आलेले भाविक प्रसादासाठी मोदक घेत असल्याने या काही दिवसांत नेहमीपेक्षा चांगली विक्री होते.
— संजय जाधव, घरगुती मोदक विक्रेता
Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
मोदकांचे दर
मोदकाचा प्रकार. साधारण दर (प्रति नग)
उकडीचा मोदक. ₹३०–५०
तळणीचा मोदक. ₹२०–३०
मावा मोदक. ₹२५–४०
चॉकलेट मोदक. ₹२५–४०
ड्रायफ्रूट मोदक. ₹४०–७०
केशर मोदक. ₹३०–५०
पिस्ता मोदक. ₹३०–५०
गुलकंद मोदक. ₹२५–४०






