कंपनीत कामावरुन एका कामगाराचा वरिष्ठासोबत वाद झाला होता. त्या रागातून कामगाराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एचआरला रस्त्यात अडवत दहशत निर्माण केली. तसेच एचआरच्या कारवर दगड मारुन नुकसान केले होते. ही घटना 28 जानेवारी रोजी सावरदरी येथे घडली होती. कामावरून वाद झाल्याने रस्त्यात अडवून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सुप्रीम फॅसिलिटीच्या माध्यमातून रिलायन्स वेअर हाऊस (भांबोली, ता. खेड, जि. पुणे) या ग्रोसरी वेअर हाऊसचे कामकाज पाहणारे उदय धर्मराज पिसाळ हे 28 जानेवारीला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घरी जात होते. यावेळी फिलिप्स कंपनी सावरदरीजवळ पोहोचले असताना आरोपींनी पिसाळ यांच्या कारच्या दोन्ही बाजूंनी ओव्हरटेक करत दोन बुलेट बाईक आडव्या घातल्या. त्यानंतर जोरजोराने हॉर्न वाजवत त्यांना गाडी थांबवण्यास सांगण्यात आले. तर गाडीचा वेग कमी झाल्यावर एकाने दगड मारला. या प्रकरणी पिसाळ यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.