राज्यात पावसाची शक्यता (फोटो- istockphoto)
पुणेकरणा उकाड्यापासून किंचित दिलासा
दोन दिवस उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज
पुणे जिल्हा आणि घाट परिसरात पावसाची शक्यता
पुणे: गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि कडक उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील उच्चांकी तापमानात किंचित घट झाल्याने पुढील दोन दिवस उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. १७) किमान तापमानात किंचित घट होऊन ते १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहिले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी (ता. १८) किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात किंचित घट होऊन ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारनंतर किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आजपासून पुढील दोन दिवस सकाळी आणि दुपारी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण राहू शकते. तसेच पुणे जिल्हा आणि घाट परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Weather : पारा ४० पार…! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त
थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त
विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे अमरावतीकरांना उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला व वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला असून, पुढील काही दिवसात वातावरणात बदल होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.
सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली असून, दुपारच्यावेळी रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हिमालयावर पश्चिमी विक्षोभ ट्रफरेषेच्या स्वरूपात सक्रीय आहे. त्यासोबतच चक्राकार वारे वाहत असून, उद्या आणखी १ नवीन पश्चिमी विक्षोभ हिमालयाला धडकण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली.






