पुरंदर विधानसभा निवडणूक (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुरंदर/संभाजी महामुनी: पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे जवळपास निश्चित झालेले दिसून येत आहे. नव्या समीकरणानुसार विद्यमान लोक प्रतिनिधीना उमेदवारी असे सूत्र जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आमदार संजय जगताप हेच आगामी उमेदवार असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. पक्षाकडून अद्याप कोणताही सिग्नल मिळालेला नसताना प्रचार यंत्रणा राबविण्यात झेंडे व्यस्त आहेत. त्यामुळे माजी सनदी अधिकारी असलेले संभाजीराव आगामी निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकविणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे. मात्र तीन पक्षांची मिळून झालेल्या महाविकास आघाडी आणि महायुती मधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. तिकीट मिळविण्यासाठी सर्वजण आपली ताकद वापरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी मधून बाहेर पडलेले नेते पुन्हा पक्षाकडे निघालेले आहेत. त्यामुळे शरद पवार पक्षात मोठ्या प्रमाणात भरती सुरु आहे. याच वातावरणात पुरंदरमधून संभाजीराव झेंडे यांनी पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण केला आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे संभाजीराव झेंडे यांची समजूत काढतात की बंड मोडून काढणार ? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुरंदर तालुक्यात शरद पवार ठरवतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण हाच कित्येक वर्षांचा ईतिहास आहे. मात्र या धोरणाला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी छेद देण्याचे काम केले. परंतु तरीही २०१४ मध्ये शिवतारे यांच्या विजयात शरद पवार यांचीच भूमिका निर्णायक ठरली हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर पुरंदर मधील राष्ट्रवादीची पाळेमुळे नष्ट होत असल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेवून शिवतारे यांचा पराभव केला आणि संजय जगताप आमदार झाले. अर्थात त्यावेळी राष्ट्रवादीकडून संभाजीराव झेंडे इच्छुक असताना शरद पवार यांचा आदेश येताच शांत बसावे लागले.
आमदार संजय जगताप यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात झेंडे यांची पक्षाला मोलाची साथ मिळाली. मागील पाच वर्षात एकीकडे राष्ट्रवादीत पदे भोगूनही वेगळ्या पक्षात स्थलांतर सुरु होते त्याचवेळी झेंडे यांनी पक्ष सावरण्याचे काम केले आहे. मोठमोठे मेळावे घेवून कार्यकर्त्यांना ताकद दिली आगामी निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने पक्षनिष्ठा मानून काम केले. परंतु तरीही पक्षश्रेष्ठी दखल घेत नसल्याचे लक्षात येताच अभी नही तो कभी नही असे म्हणून मी यंदा निवडणूक लढविणारच अशी गर्जना केली.
दरम्यान काही दिवसापूर्वी सोशेल मिडीयावरील वक्तव्यावरून संभाजीराव झेंडे आणि आमदार संजय जगताप यांच्यामध्ये अचानक वॉर सुरु झाले. त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे लक्षात आले. जेजुरी येथे एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि सुप्रिया सुळे आले असताना झेंडे हे पुणे येथून जेजुरीपर्यंत शरद पवार यांच्याच गाडीत बसून आले. मात्र त्यांनी झेंडे यांची कोणतीही दखल घेतल्याचे दिसून आले नाही. त्यावरून पवारांनी झेंडे यांचे पक्षातील महत्व कमी केले का ? अशी चर्चाही तालुक्यात जोरदार रंगली आहे.
महायुती मधून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच महायुतीमधील भाजपचे गंगाराम जगदाळे यांनी देखील सासवडला कार्यकर्ता मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन केले आहे. भाजप मधील माजी आमदार अशोक टेकवडे अद्यापही वेट अंड वॉच च्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून माजी जिप सदस्य दत्तात्रय झुरंगे आणि जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ दिगंबर दुर्गाडे यांची नावे चर्चेत होती. मात्र राष्ट्रवादीने मेळावा घेवून दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तर झुरंगे यांनीही दिगंबर आणि दत्तात्रय एकाची देवाची नावे असल्याचे सांगून स्पर्धेतून माघार घेतली आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे संजय जगताप यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका करण्यापेक्षा भाजपचा फंडा वापरून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना कॉंग्रेस मध्ये घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. गावोगावचे कार्यकर्ते पक्षात येत असून विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने तसेच गाव भेटीत आमदार संजय जगताप व्यस्त आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे हे सुद्धा गाव भेटी, मेळावे, पत्रकार परिषदा घेवून उमेदवारी जाहीर करताना दिसून येत आहेत. सासवडला खेळ पैठणीचा उपक्रम घेवून त्यांनी तोही एकप्रकारे संदेश दिला आहे. कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करण्यात व्यस्त असलेले संभाजीराव खरोखर बंडाचा झेंडा फडकविणार का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.