
Indigenous weapons exhibition at Datta Mandir on occasion of 77th Republic Day Pune News
पुणे : येत्या 26 जानेवारी रोजी देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तयारी केली जात आहे. याचबरोबर पुण्यामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. यानिमित्ताने (Pune News) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने स्वदेशी शस्त्रात्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
यामध्ये स्नायपर एमके १, एयर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल (विध्वंसक), एके ४७ रायफल, एमएमजी गन, टियर गॅस गन यांसह ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन, एरियल बॉम्ब अशा देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणाऱ्या अभेद्य शस्त्रांना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल, हवाई दलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा यांसह विविध प्रकारची युद्धसज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मॉडेल्स देखील ठेवण्यात आली आहेत.
हे देखील वाचा : पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या शस्त्रांचे प्रदर्शन बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी आमदार व ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्रीदत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह लष्करातील माजी अधिकारी, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, “भारत सरकार रक्षा मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ने पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशांत निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे.”
हे देखील वाचा : पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत
सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून पुणेकरांनी प्रत्येक शस्त्राविषयी माहिती देखील तात्काळ घेता येत आहे. ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांकरीता लागणारा दारुगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टिम, बुलेटस्, हँड ग्रेनेड, अँटि सम्बरिन रॉकेट, एरियल बॉम्ब यांसह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळत आहे.
आत्मनिर्भर, बलशाली व विश्वगुरू भारत साकारण्याकरिता संपूर्ण देशात शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी पुण्यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड कार्यरत असून त्यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांसह पुणेकरांनी मोठया संख्येने भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.