(फोटो- टीम नवराष्ट्र)
बारामती: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ६ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे अशी आंदोलनकरते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. दरम्यान राज्यातील सकल मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एकत्रित येत आहे. दरम्यान ५० टक्क्यांच्या आत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता इंदापूर शहरात रास्ता रोको करण्यात आला.
५० टक्क्यांच्या आत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करिता इंदापूर बस स्थानकासमोर रविवारी सकल मराठा समाज इंदापूर तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील निवेदन इंदापूरच्या नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांनी स्वीकारले.
मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न गेली एक वर्ष महाराष्ट्रात चालू असताना सरकार दरबारी वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक होत आहे. मागील पाच दिवसांपासून मराठा समाजाचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांची प्रकृती खालवलेली आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सुरू असलेले त्यांचे उपोषण सोडवावे. अन्यथा महाराष्ट्रात अतिशय तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले असून सरकारला इशारा देण्यात आला आहे.
सदरच्या रास्तारोको प्रसंगी हातात भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. जवळपास ४० मिनिटे रास्ता रोको करण्यात आला.अनेकांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.यावेळी एक मराठा लाख मराठा,ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे,छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या. दरम्यान राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी परभणी,पुणे, जालना आणि अहमदनगर बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या अहमदनगर बंदची हाक सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे. तर जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे देखील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज ४ था दिवस आहे.