
अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करा, अन्यथा...; आमदार सुनील शेळकेंचा अधिकाऱ्यांना इशारा
वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी पंचायत समिती मावळ येथे शुक्रवारी सर्व विभागांची सविस्तर शासकीय आढावा बैठक पार पडली. श्रीरंग बारणे आणि सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित तसेच पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग, महावितरण तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. विकासकामांचा वेग वाढवताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखावा आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य सेवा या बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी दिला. विकासकामे करताना दर्जा, वेळेचे नियोजन आणि जनहित यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. यावेळी कायदा व सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांच्या प्रश्नावर आमदार सुनील शेळके यांनी पोलिस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. अवैध धंद्यांविरोधात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीची तयारी ठेवावी, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय, मटका, एमडी पावडरचा अवैध व्यापार, जुगार, अवैध दारू विक्री किंवा इतर बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे, तसेच वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यामध्ये कोणतीही कुचराई सहन केली जाणार नसल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या आढाव्यात शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता राखणे, शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत शैक्षणिक सुविधा सक्षम असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले. आमदार निधीतून सुरू असलेली विकासकामे दर्जेदार आणि निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, अंगणवाडी इमारतींची कामे गतीने पूर्ण करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने अधिक समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
प्रलंबित कामे, विकासकामांतील अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर शासकीय यंत्रणेने अधिक गतीने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच कृषी क्षेत्रात झालेल्या नुकसानीबाबत संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.
“विकासकामांचा वेग वाढवताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखावा आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य सेवा या बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही.” – खासदार, श्रीरंग बारणे.
तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हा प्रशासनाचा प्राधान्यक्रम असावा, असे सांगत आमदार सुनील शेळके यांनी सर्व विभागांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अवैध धंद्यांविरोधात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीची तयारी ठेवावी. तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय, मटका, जुगार, अवैध दारू विक्री किंवा इतर बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत.” – आमदार, सुनील शेळके.