आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Political News : वडगाव मावळ : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी महत्त्वपूर्ण विधान करत पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, अजित दादांच्या निधनानंतर पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. दादांनी याबाबत सर्वांशी सविस्तर चर्चा केली नव्हती, मात्र सध्याच्या परिस्थितीत पक्षाच्या भविष्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे सूचक वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. आमदार सुनील शेळके म्हणाले की, “दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष वाढत असेल, तर तो आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. पक्षाचे हित लक्षात घेऊन सर्वांनी सकारात्मकतेने निर्णय घ्यावा,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच, “ज्यांना सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य नसेल, त्यांनी पक्ष सोडण्याचा पर्याय निवडू शकतात,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
हे देखील वाचा : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून न निघाल्याची भावना व्यक्त करताना शेळके म्हणाले, “दैनंदिन कामकाज करताना दादांची उणीव पावलोपावली जाणवते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली होती.”
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “या घटनेमागील सत्य मुख्यमंत्री लवकरच जनतेसमोर आणतील,” असे ते म्हणाले. मावळ तालुक्याच्या विकासाचा उल्लेख करताना शेळके यांनी सांगितले की, दादांच्या काळात अनेक प्रकल्पांना निधी मिळत होता. “संत तुकाराम महाराजांच्या पांढऱ्या डोंगराच्या पायथ्याशी सुमारे १२ ते १४ कोटी रुपयांचा कॉरिडॉर उभारण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. आगामी काळात हे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज
एकूणच, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर निर्माण झालेल्या परिस्थितीत विलीनीकरणाचा पर्याय अधिक मजबूत होत असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकसंघ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






