पुणे नवरात्री 2025 (फोटो- टीम नवराष्ट्र)
सोनाजी गाढवे /पुणे: भवानी पेठेतील लक्ष्मीबाजार परिसरातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू मानले जाते. येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे शहरातील हिंदू खाटीक समाजाचे आराध्य दैवत आहे. शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मंदिर आजही समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
लक्ष्मीबाजारात लक्ष्मीचे छोटे पुरातन मंदिर होते त्यात देवीची दगडी मूर्ती होती त्यानंतर मंडळाने १९१७ मध्ये राजस्थानातून गारगोटीच्या एका पाषाणात कोरलेली लक्ष्मीची सुबकमुर्ती आणून, मंदिरात तिची प्रतिष्ठापना केली. हत्तीवर अरुड आलेल्या या गजलक्ष्मीची १९२२ मध्ये स्थापना झाली. देवीची ही मूर्ती कन्याकुमारी देवीची प्रतिकृती मानली जाते. दगडी मूर्तीला गदा, कमंडलू आणि कमळ आहे तर उजवा हात भक्तांना आशीर्वाद देतो. स्थापनेच्या काळात समाजाच्या पंच मंडळींनी निधी उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. बकरी, शेळी आणि मेंढी खरेदी-विक्रीच्या बाजारामुळे या भागाला ‘लक्ष्मीबाजार’ हे नाव लाभले.
पूर्वीचे छोटेसे मंदिर दशकभरापूर्वी जीर्णोद्धारित करण्यात आले. त्यासाठी लागणारा पाच लाख रुपयांचा निधी समाजातील मांस विक्री करणाऱ्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे उभारला. एका चामडीमागे दहा पैसे या हिशेबाने संकलित केलेल्या निधीतून मंदिराचा विकास झाला. सध्या मंदिरात नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. घटस्थापना, भवानी मातेला तोरण अर्पण, अष्टमीला नवचंडी यज्ञ, कोजागरी पौर्णिमेला भंडारा आणि महाप्रसाद यांसारखे सोहळे भाविकांच्या मोठ्या सहभागात पार पडतात. या उत्सवात कोणतीही वर्गणी न काढता सर्व समाजबांधव एकत्र येतात. विशेष म्हणजे एरवी मांसाहार करणारा समाज नवरात्रोत्सवात शुद्ध शाकाहार पाळतो.
धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रम हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. शालेय साहित्य वाटप, वैद्यकीय मदत, सामुदायिक विवाह, आरोग्य तपासणी शिबिरे यांसारखे उपक्रम नियमितपणे राबवले जातात. आळंदी व पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आल्या असून वारीदरम्यान वारकऱ्यांच्या जेवण, मुक्काम आणि औषधोपचाराची सोय केली जाते. करोना संकटकाळात मंडळाने गरजू कुटुंबांना धान्यवाटप, मृतांच्या अंत्यविधीची जबाबदारी, अनाथ मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली.
समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाला महत्त्व देणे हे मंडळाचे मोठे कार्य आहे. स्थापनेपासूनच समाजबांधवांना शिक्षणप्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला. आज समाजातील केवळ दहा टक्के बांधव परंपरागत व्यवसायात आहेत. बाकी समाजातील तरुण पिढी उद्योग-व्यवसाय, सरकारी नोकरी आणि खासगी कंपन्यांमध्ये उत्तुंग पदांवर कार्यरत आहे.
शहरात स्थायिक झालेल्या खाटीक समाजाने आपली परंपरा, संस्कृती आणि श्रद्धास्थाने जपली आहेत. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी आणि लक्ष्मीबाजारची महालक्ष्मी ही त्यांची आराध्य दैवते. या आराधनास्थानांमुळे समाजात एकीची भावना दृढ झाली आहे. अध्यक्ष अरुण घोलप, सचिव गणेश जठार यांच्यासह मच्छिंद्र कांबळे, विजय घोलप, विनोद गायकवाड, रविंद्र कांबळे, मधुकर गालिंदे यांसारखे पदाधिकारी आजही समाजकार्य आणि धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत. लक्ष्मीबाजारचे महालक्ष्मी मंदिर हे फक्त खाटीक समाजापुरते मर्यादित नाही, तर पुणे शहरातील सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव यांचा संगम असलेले हे मंदिर आजही पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात महत्त्वाचे स्थान राखून आहे.