बारामतीच्या मातीतला शब्दांचा ‘देवकाते’ वारसा नव्या पिढीसमोर आणण्याची गरज
बारामती / अमोल तोरणे : ग्रामीण जीवनातील माणूस, त्याच्या भावना, संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक वास्तव यांना आपल्या लेखणीतून प्रभावीपणे शब्दबद्ध करणारे दिवंगत साहित्यिक, गीतकार, पटकथाकार आणि संवादलेखक मा. दा. देवकाते यांचे साहित्यिक योगदान आजच्या पिढीसमोर आणण्याची गरज आहे. बारामतीच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेतील हे महत्त्वाचे नाव काळाच्या पडद्याआड जाऊ नये, यासाठी त्यांच्या साहित्याचे जतन आणि पुनर्प्रकाशन होणे आवश्यक आहे.
बारामती तालुक्यातील नव्या पिढीतील प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणावर साहित्य जतन केले आहे. मात्र आजही मा.दा देवकाते यांच्या या क्षेत्रातील अलौकिक कामगिरीची माहिती नव्या पिढीला माहिती नाही.
मा. दा. देवकाते म्हणजेच मारुती दाजी देवकाते. त्यांचा जन्म १९४१ मध्ये झाला. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी तब्बल चार दशके लेखन केले. सुमारे १५० चित्रपटांच्या कथा व पटकथा त्यांनी लिहिल्याची नोंद आहे. ‘डाळिंबी’, ‘थापाड्या’, ‘पटलं तर व्हय म्हणा’, ‘पांडोबा पोरगी फसली’, ‘भटकभवानी’, ‘भन्नाट भानू’, ‘भामटा’, ‘रंगू बाजाराला जाते’ आणि ‘हळद रुसली कुंकू हसलं’ यांसारख्या चित्रपटांशी त्यांचे संवादलेखक म्हणून नाते होते.
गीतकार म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. ‘गणराजाला करू मुजरा’, ‘माणसा रे माणसा ठेव’, ‘माउली देवाहूनही थोर’, ‘लाख तारका चमचम’, ‘भावफुलांची बाग सखये’, ‘हे गणनायक सिद्धीविनायक’ यांसारखी त्यांची गीते आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘गणराजाला करू मुजरा’ या गीताला राम कदम यांचे संगीत आणि छोटा गंधर्व यांचा आवाज लाभला होता. तर ‘माउली देवाहूनही थोर’ हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात लोकप्रिय झाले.
मा. दा. देवकाते यांच्या साहित्याचा आवाका प्रचंड मोठा होता. भगवद्गीता आणि महाभारताचे अभंगरूपांतर त्यांनी केले. ‘अभंग गीता’ आणि ‘अभंग महाभारत’ या रचनांबरोबरच ‘गीत भीमाचे गाऊ’, ‘आता तुझी पाळी’, ‘शब्दशराब’, ‘कसेल त्याची जमीन’ आणि ‘उगम’ यांसारख्या साहित्यकृतींची नोंद आढळते.
साहित्याचा ठेवा डिजिटल करण्याची गरज
मा. दा. देवकाते यांच्या लेखनाची व्याप्ती पाहता त्यांच्या साहित्याचा स्वतंत्र संग्रह तयार करणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांचे पुनर्मुद्रण, गीतांचे ध्वनिमुद्रण संकलन, त्यांच्या जीवनावर व्याख्यानमाला तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांच्या साहित्याची ओळख करून देणे, अशा उपक्रमांमधून हा साहित्यिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकतो.
बारामतीच्या मातीतून उभ्या राहिलेल्या या प्रतिभावंताने मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान संशोधन, संकलन आणि नव्या पिढीपर्यंत प्रसाराच्या माध्यमातून जिवंत ठेवणे, हीच मा. दा. देवकाते यांना खरी आदरांजली ठरेल.






