शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू (संग्रहित फोटो)
कवठे येमाई : शिरूर शहरातील लाटेआळी परिसरातील आंबेडकरनगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून ३३ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. इतकेच नाहीतर लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात हरीश ऊर्फ हरी दादाभाऊ गंगावणे याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात रोहित रविंद्र सोनवणे (वय २६, रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आणि आदित्य पवार (दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश गंगावणे याचे आरोपींसोबत पूर्वीपासून भांडण होते. या जुन्या वादातून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर हरीश याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
दरम्यान, दोन पिस्तुले व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






