
शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
पुणे : देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी (दि.२३) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, ही कामे पूर्ण झाल्याने शुक्रवारी पुणेकरांना पाण्यासाठी वाट पाहण्याची वेळ आली. टॅंकर पॉईंटही बंद असल्याने त्याद्वारे होणारा पाणी पुरवठाही बंद राहिल्याची भर पडली. याचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले. प्रशासनाने टप्प्या टप्प्याने शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला आहे.
गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहिल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा होता. मात्र, अनेक भागांत पाणीच न आल्याने शुक्रवारी सकाळी नगरसेवकांना प्रभागातून नागरिकांचे सकाळपासून फोनवर फोन सुरू झाले. याचे सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. नगरसेवकांनी प्रशासनाच्या नियोजनावर जोरदार टीका केली. नगरसेवक कुणाल टिळक यांनी गुरुवारी पाणी नव्हते, शुक्रवारी बारापर्यंत पाणी मिळाले नाही. टँकरही मिळाले नाहीत. नागरिक अक्षरशः पाण्याविना आहेत. शुक्रवारी दिवसभर पाणी सुरू ठेवावे, अशी मागणी केली.
उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी
कासिफ सय्यद यांनी मिठानगर, अश्रफनगर, कौसरबाग व एनआयबीएम परिसरात केवळ एक तास पाणी येत असून तेही दूषित असल्याची तक्रार करत, पाणी नसताना इमारतींना बांधकाम दाखले का देता ? असा प्रश्न उपस्थित केला.
धनश्री कोल्हे यांनी नांदेड फाटा ते नंदोशी दरम्यान केवळ २० मिनिटे दूषित पाणी येत असल्याचे सांगत संपूर्ण पाईपलाईन बदलण्याची मागणी केली. दादा कोद्रे यांनी केशवनगर, शेवाळवाडी, मांजरी भागात मंजूर क्षमतेपेक्षा अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणले. १२ एमएलडी मंजूर असताना केवळ ४ एमएलडी पाणी दिले जाते,” असा आरोप त्यांनी केला.
सुनील शिंदे यांनी धरणात पाणी उपलब्ध असूनही नियोजनात त्रुटी असल्याचे म्हटले. पुनीत जोशी यांनी पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना मेसेज द्वारे माहिती देण्याची मागणी केली. स्वरदा बापट यांनी सकाळपासून पाणी नाही, विभागाकडून माहिती मिळत नाही, अशी तक्रार करत २४x७ योजनेला गती देण्याची मागणी केली.
अनिता इंगळे यांनी तर धरण उशाला, पण घसा कोरडा” अशी परिस्थिती असल्याचे सांगत अनेक भागांत ५-६ दिवस पाणी येत नसल्याची तक्रार केली. गळती, अपूर्ण टाक्या आणि टँकर व्यवस्थेतील गोंधळावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तारु यांनी २३ एप्रिल रोजी जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत कामे व फ्लो मीटर बसवण्यामुळे पाणीपुरवठ्यात ५-६ तास विलंब झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली.
पाणीपुरवठावरून नगरसेवकांच्या तक्रारी
पाणीपुरवठावरून नगरसेवकांच्या तक्रारी सुरूच होत्या. अखेर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या, खासगी टँकर चालकांच्या बंदमुळे क्लोजर आठवडाभर पुढे ढकलावा लागला. त्यामुळे गुरुवारी ४५ प्रकारची मोठी कामे सुरू होती. ही कामे शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती. शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल.