सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केशवनगर-खराडी उड्डाणपुलाचे रविवार, १६ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. केशवनगर-खराडी पूल, गोदरेज इन्फिनिटी जवळ, केशवनगर, मुंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजितदादा पवार यांनी पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची आठवण कायम राहावी, या उद्देशाने उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आल्याचे सुरवसे पाटलांनी सांगितले आहे. या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११ मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे. अजितदादांच्या पुणे शहराच्या विकासातील योगदानाचा सन्मान म्हणून उड्डाणपुलाचे ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
उड्डाणपुलाबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.
केशवनगर-खराडी उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११.४० मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावर एकूण सात गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी ३५.२ मीटर आहे. खराडी बाजूकडील अॅप्रोच रस्त्याची लांबी ४० मीटर, तर केशवनगर बाजूकडील अॅप्रोच रस्त्याची लांबी १२५ मीटर आहे. पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची निविदा रक्कम २३.४७ कोटी रुपये असून आतापर्यंत २३ कोटी रुपये खर्च झाला आहे. या पुलामुळे केशवनगरकडून खराडीकडे जाणाऱ्या वाहनांना करावा लागणारा सुमारे सहा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास टळणार आहे. त्यामुळे बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा सुमारे अर्धा तास वेळ वाचणार आहे. प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे. त्यामुळे केशवनगर, खराडी आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरळीत आणि वेळेची बचत करणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे.