संग्रहित फोटो
सासवड : पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शासनाने तीन हजार एकर जागा निश्चित केली असून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. शासनाने भूसंपादन करताना एरोसिटीसह तीन हजार एकर जागा घेणार असल्याचे सांगितले होते. आणि तीन हजार एकर मध्ये संपूर्ण प्रकल्प पूर्ण होत असताना आमचे क्षेत्र पुन्हा का घेतले जात आहे ? असा जाहीर सवाल उपस्थित केला आहे. यापुढे कोणत्याही प्रकारे जमिनी भूसंपादन होऊ दिली जाणार नाही, असा थेट इशारा उदाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. आता शेतकऱ्यांच्या जमिनीची संमती घेवून त्यांना त्यांच्या क्षेत्राचे त्यातील विविध बांधकामे, इतर गोष्टींचे नुकसानपोटी एकरकमी परतावा देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माहिती घेवून आणि खात्री झाल्यानंतर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. मे महिन्यात शेतकऱ्यांच्या संमती घेण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला १० जूनपर्यंत स्वच्छेने परवानगी देणाऱ्यांना प्राधान्य राहील अशा आशयाची नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनीची संमती दिली आहे. आपापसातील भाऊबंदकीतील वाद तसेच कौटुंबिक वाद मिळविण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करून संमती देण्यास सुरुवात केल्याने पहिल्या काही दिवसातच संमती देणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी वाढली.
सुरुवातीला महिनाभर भूसंपादन झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना भूसंपादनसाठी प्रथम १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा १५ – १५ दिवसांनी मुदतवाढ दिली. दरम्यान आतापर्यंत ९० टक्के पेक्षा जास्त क्षेत्राचे भूसंपादन झाले असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मोबदला म्हणून देण्यात येणारा १० टक्केचा परतावा एरोसिटी मध्ये देण्यात येणार असून त्यासाठी आणखी जवळपास ६२५ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. यासाठी वनपुरी उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्या असून भूमी अभिलेख तसेच महसूल विभागाकडून मोजणीस सुरुवात केली आहे.
अधिकाऱ्यांना लावले पिटाळून
दरम्यान दोन दिवसापूर्वी उदाचीवाडी गावात जमिनीच्या मोजणीस गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन वेळा अक्षरशः हुसकावून लावले आहे. आमची एक गुंठा जमीन घ्यायची नाही असा इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव रिकाम्या हाताने माघारी यावे लागले आहे. ज्यांना संमती द्यायची असेल त्यांची घ्या. मात्र आम्ही जमीन देणार नाही त्यामुळे येथे भूसंपादन करू नये असे म्हणून महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.
एक गुंठाही जमिनीचे भूसंपादन होऊ दिले जाणार नाही
शासनाने आतापर्यंत तीन हजार एकर जमिनीचे भूसंपादन केल्याचा दावा केला आहे, आणि त्यामध्येच एरो सिटी करणार असल्याचे पूर्वीच सांगितले आहे. मग आता अतिरिक्त जमीन का घेतली जात आहे ? असा प्रश्न उपस्थित करून यापुढे कोणत्याही परिस्थितीत एक गुंठाही जमिनीचे भूसंपादन होऊ दिले जाणार नाही असा इशारा उदाचीवाडीचे शेतकरी गणपत कुंभारकर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी विमानतळासाठी सात गावातील तब्बल ७ हजार एकर क्षेत्रावर शिक्के मारले आहेत. मात्र शासनाने ३ हजार एकर क्षेत्र घेणार असून उर्वरित क्षेत्र परत देणार असल्याचे सांगितले. मात्र अद्याप पर्यंत उर्वरित क्षेत्रावरील शिक्के काढले नाहीत. मग असे असताना आणखी जमिनीचे संपादन कशासाठी ? एरोसिटीसह क्षेत्र पूर्वीच घेतले असताना संपूर्ण गावच उठवून लावणार का? असे प्रश्न उदाचीवाडी येथील मच्छिंद्र माणिक कुंभारकर यांनी उपस्थित केले आहेत.