
राणा सूर्यवंशींना वाय प्लस सुरक्षा का? रोहित पवारांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाच्या तपासावर नाराजी व्यक्त करताना आमदार पवार यांनी संबंधित व्यक्तींच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केले. सूर्यवंशी यांचे तीन मित्र अद्याप सापडले नसल्याचा मुद्दा मांडत या प्रकरणातील संशयितांवर कारवाई का झालेली नाही, असा सवाल त्यांनी केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांच्याकडे तपासाची जबाबदारी असतानाही तपास अपेक्षित गतीने होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास अधिक सक्षमपणे करून संबंधितांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राणा सूर्यवंशी संचालक असलेल्या रुग्णालयातून ते नेमके कधी बाहेर पडले, याबाबत स्पष्टता नसल्याचा मुद्दाही आमदार पवार यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय अथवा व्यावसायिक लाभ मिळविण्याचा हेतू होता का, याची तपास यंत्रणांनी पडताळणी करावी, असे ते म्हणाले. बारामतीची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींची नावे जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना शासनाने पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, अशी टीका रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची गरज असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
बारामतीतील गुन्हेगारीवरून प्रशासनाला धरले धारेवर
बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबतही रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली. दिवंगत अजित पवार यांचा शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक होता. मात्र, सध्या लूटमार, हप्तेखोरी आणि टोळीयुद्धाच्या घटनांबाबत चिंता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांसमोरच गँगवॉरच्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांवर नियंत्रण कोणाचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शहरातील रोडरोमिओंचा त्रास वाढल्याने मुलींना सायंकाळी सात वाजल्यानंतर घराबाहेर पडताना भीती वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे सुद्धा वाचा : आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं
टोरंटो प्रकल्प हलविण्याचा विचार करा
टोरंटो प्रकल्पाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध नसून, तो ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे, त्या जागेबाबत आक्षेप असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याच्या पर्यायाचा शासनाने विचार करावा. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन आमदार पवार यांनी केले.
Ans: राणा सूर्यवंशी यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यामागील कारणांची सखोल चौकशी करावी आणि या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
Ans: बारामतीमध्ये लूटमार, हप्तेखोरी, टोळीयुद्ध आणि रोडरोमिओंचा त्रास वाढत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Ans: टोरंटो प्रकल्पाला नागरिकांचा विरोध नसून, तो ज्या जागेवर प्रस्तावित आहे, त्या जागेबाबत आक्षेप असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याच्या पर्यायाचा शासनाने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.