आता घरबसल्या मिळवता येणार चॉइस नंबर (फोटो- सोशल मीडिया/istockphoto)
पुणे: वाहनाला आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने चॉईस नंबर (पसंती क्रमांक) मिळविता येणार असून राज्यभरातील आरटीओत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून ओटीपीच्या सहाय्याने ऑनलाईन पेमेंट करून नंबर घेता येणार आहे. यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे चॉईस नंबर मिळविण्याची सुविधा सुलभ झाली आहे.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर हौशी वाहनमालक त्याच्यासाठी चॉईस नंबर घेतो. अनेकजण त्यांना लकी असलेले नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख असे क्रमांक घेतात. तसेच, नंबरप्लेटच्या माध्यमातून ते गाडीला लावतात. यासाठी अनेकजन आग्रही असतात. परिवहन विभागाकडून देखील पैशांची आकारणी केली जाते. आवडीचा क्रमांक हवा असेल तर त्यासाठी विशीष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. नंतर हा नंबर संबंधिताला राखीव करून ठेवण्यात येतो. मात्र, एकाच नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेश धारकाला तो नंबर दिला जातो.
आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धतही आहे. आरटीओच्या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला मोठा महसूल देखील मिळतो. मात्र, या सर्व प्रक्रियेसाठी नागरिकांना आरटीओत जावे लागत होते. आता घरबसल्या नागरिकाना असे नंबर घेता येणार आहेत. दरम्यान, चॉईस नंबर बुकींग ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्यानंतरही लिलाव मात्र पुर्वीप्रमाणे ऑफलाईन राहणार आहे. नोंदणी क्रमांकाची नवीन सिरीज खुली होण्यापुर्वी क्रमांकासाठी लिलाव होतो. यामध्ये राखून ठेवण्यात आलेले नंबर वगळता इतर नंबर हे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोमवारपासून (दि.२५) ही सुविधा सुरू झाली असून काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
…अशी करा प्रक्रिया
वाहनधारकांना घरबसल्या चॉईस नंबर मिळवायचा आहे. त्यांनी http://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्याठिकाणी आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून ओटीपी प्राप्त करावा. नंतर आवश्यक ती माहिती भरून ऑनलाईन पद्धतीने नंबर राखून ठेवावा. ऑनलाईन नंबर आरक्षीत केल्यास त्याची पावती संबंधीत वाहन वितरक यांना द्यावी लागणार आहे.
पुणेकरांसाठी मोठी बातमी
गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परंतु पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गांसाठी वरिष्ठस्तरावरून आदेश काढण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
दुचाकीस्वारासह सहप्रवाशानेही हेल्मेटचा वापर करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून सुरुवातीला जनजागृती करण्यात येणार आहे. दुचाकी चालविताना संबंधितांनी हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून, तूर्तास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार नाही-
– अमितेश कुमात, पुणे पोलीस आयुक्त