संग्रहित फोटो
पुणे : कोरेगाव भीमा परिसरात पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. एक जानेवारी रोजी येथे देशभरातून हजारो नागरिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यानिमित्त वाहतूकीत देखील बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी (३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी पाचपासून वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच नगरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. हा बदल एक जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी येतात. त्यानिमित्त पुणे पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैणात असणार आहे. तसेच, या भागातील गर्दी विचारात घेऊन वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहन पार्किंगसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले आहे.
पुण्याकडून नगरकडे जाणारी जड वाहतूक खराडी बाह्यवळण मार्ग, हडपसर, सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरेमार्गे शिरूरकडून नगर रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्यावरून आळंदी, चाकणकडे जाणारी जड वाहने (टेम्पो, ट्रक) हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळण मार्ग, विश्रांतवाडीमार्गे आळंदी, चाकणकडे जातील. मुंबईहून नगरकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळे फाटामार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईहून नगरकडे जाणारी हलकी वाहने (मोटार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जातील.
वाहतूक पोलिसांनी पेरणे गाव तसेच तुळापूर फाटा, लोणीकंद परिसरातील बारा ठिकाणी दुचाकी, मोटारी लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पार्किंग स्थळापासून विजयस्तंभाकडे जाण्यासाठी पीएमपी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नागरिक येणार आहेत. परिसरात ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. शुक्रवारी सकाळपासून बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून बाहेरगावाहून सातशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी येणार आहेत.