पुण्यात तापमान वाढले (फोटो- istockphoto)
पुणे: पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसा असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांमुळे वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी शिवाजीनगर येथे ४०.१, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.१, पाषाण येथे ४०, हडपसर येथे ३९.९, चिंचवड येथे ३८.६, एनडीए येथे ३८.२ अंश सेल्सियस तापमान होते. तर शुक्रवारी शिवाजीनगर येथे ४०.५, पाषाण येथे ४०.४, लाेहगाव येथे ४२.९,चिंचवड येथे ३९.२, मगरपट्टा येथे ४० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नाेंद झाली.
हवामान शास्त्रज्ञ डॉ सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. २२ एप्रिलनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान ढगाळ होण्याची, तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.’
उत्तरेकडील राज्यांत वाढलेले तापमान, तिकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होत आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे.
पुण्यात तापमानाचा पारा 41 अंश पार; येत्या दोन दिवसांत…
उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या संभाच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या रुग्णालयांनी आणि शासकीय रुग्णालयांच्या स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा विचार करता आरोग्य विभगाच्यावतीने अलर्ट जारी करण्यात आला असून, डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. वृद्ध आणि गर्भवतींना उष्णतेच्या विकारांचा मोठा धोका संभवतो, या पार्श्वभूमीवर कुटुंबातील अशा सदस्यांची विशेष काळजी घेण्याची सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.
उष्णतेच्या लाटेपासून सावधगिरी गरजेची
उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी सावधानता बाळगणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी कडक उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.