
पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार नाव जाहीर
२७ तारखेला अधिकृत वेळापत्रक
विभागीय आयुक्तांनी महापौर निवडीचे आदेश शुक्रवारी (दि. २३) प्रशासनाला दिले आहेत. या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले की, “मंगळवारी (दि. २७) महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाईल. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि मतदानाचे सविस्तर वेळापत्रक स्पष्ट होईल.”
आरक्षणामुळे इच्छुकांची भाऊगर्दी
महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर मुंबई आणि दिल्लीतील नेत्यांकडेही लॉबिंगसाठी धाव घेतली जात आहे. विशेषतः विधानसभा मतदारसंघनिहाय समीकरणे आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच पक्षाकडून नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
निवडीची मुख्य गणिते :
प्रादेशिक समतोल : भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघांतील राजकीय ताकद.
पॅकेज डील : महापौरपदासोबतच उपमहापौर, स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या निवडीची सांगड घातली जाणार आहे.
पक्षनिष्ठा आणि गटबाजी : शहरातील अंतर्गत गटबाजी शमवण्यासाठी वरिष्ठ नेते काय सुवर्णमध्य काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
६ फेब्रुवारीच्या सभेत प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असली, तरी पडद्यामागून हालचालींना मोठे उधाण आले आहे. त्यामुळे शहराचे प्रथम नागरिकपद नेमके कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक!
खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, शासकीय कामात अडथळा, जमीन घोटाळा तसेच शस्त्र परवाना नियमांचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारे २९ नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात दिसणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी अशा उमेदवारांनाही मतदारांनी निवडून दिले आहे. ज्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आणि गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ तर शिवसेनेच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे.