Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
तर विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रविवारी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
सोमवारी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, विविध भागांत हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप आणि सरींचा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज असून, या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर २० ते २७ ऑगस्ट या कालावधीतही कोकणात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
कोकणातील सक्रिय मान्सूनचा परिणाम मुंबई आणि उपनगरांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाच्या काही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. सांताक्रूझ येथील सप्टेंबरअखेरच्या सरासरी पावसाच्या प्रमाणाच्या तुलनेत यंदाच्या पावसाची स्थिती सुधारण्यासाठी आगामी पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही दिवसांत पावसाच्या जोरदार सरींसाठी सज्ज राहावे लागणार आहे.



