
पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास...; आयुक्तांनी दिला इशारा
शहरात नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना, आंद्रा व एमआयडीसी मिळून दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. सध्या पवना व आंद्रा धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असली, तरी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. परिणामी, शहराच्या दैनंदिन कोट्यातून सुमारे ६५ एमएलडी पाणी कमी मिळणार असून नियमित वेळेपेक्षा कमी वेळ पुरवठा होणार आहे.
महापालिकेचे कडक निर्बंध व इशारे
एसटीपी बंद असल्यास नळजोड तोडणार : मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने, झाडे व स्वच्छतेसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाण्याचाच वापर करावा. एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी तोडण्यात येतील.
बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्यावर बंदी : बांधकाम व्यावसायिकांनी केवळ एसटीपीतील प्रक्रिया केलेले पाणी वापरावे. नदीतून बेकायदा पाणी उपसून टँकरद्वारे विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होतील.
वॉशिंग सेंटरवर पाळत : वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या सर्व्हिस सेंटरचे अनधिकृत नळजोड खंडित करून गुन्हे दाखल केले जातील. नवीन व्यावसायिक आस्थापनांना नळजोड मिळणार नाहीत.
मोटार पंपांवर जप्ती : नळाला थेट मोटार लावून पाणी खेचल्यास पंप जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल.
सोसायट्यांचे पाणीबचतीचे नियोजन
कपातीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन, रावेत-किवळे-मामुर्डी आणि चिखली-मोशी-चरहोली फेडरेशनने नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले आहे.
फेडरेशनचे दत्तात्रेय देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत
“आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याची सुरक्षितता ठरवणार आहे. नागरिकांनी शिळे पाणी फेकून न देणे, नाहक साठा न करणे आणि काटकसरीने वापर करून सहकार्य करावे. क्षेत्रीय पातळीवर विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
Ans: शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
Ans: जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्टपर्यंत पाणीकपात कायम राहणार आहे.
Ans: पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.