
भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चाकण या नवीन मेट्रो मार्गाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) तयार केलेल्या १२ हजार ९३७ कोटी २३ लाख रुपयांच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यास (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळी एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. हा अंतिम आराखडा आता राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.
प्रस्तावित नवीन मार्ग ४५.२९५ किलोमीटर लांबीचा असून यात एकूण ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. यापैकी २८ स्थानके पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत, तर उर्वरित ६ स्थानके चाकण परिसराच्या हद्दीत असतील. महापालिकेच्या सभागृहात या प्रकल्पाचे लोकप्रतिनिधींसमोर दोन वेळा सादरीकरण करण्यात आले होते. सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला शत्रुघ्न काटे यांनी अनुमोदन दिले. नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांनी मांडलेली उपसूचना स्वीकारत महापौर रवी लांडगे यांनी या प्रस्तावावर अंतिम मंजुरीची मोहर उमटवली.
असा असेल नवा मेट्रो मार्ग
निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकातून सुरू होणारा हा मार्ग ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक आणि भुजबळ चौक मार्गे वाकडपर्यंत पोहोचेल. वाकड येथे प्रवाशांना हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाशी जोडणी (इंटरचेंज) उपलब्ध होईल. तेथून पुढे विशालनगर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळीमाता चौक, सेन्चुरी एन्का, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, पीआयईसी, मोशी भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा आणि नाणेकरवाडी असा प्रवास करत हा मार्ग चाकण येथे समाप्त होईल.
प्रकल्पाची आर्थिक रचना
एकूण खर्च : १२,९३७ कोटी २३ लाख रुपये
केंद्र व राज्य सरकारचे समभाग भांडवल : प्रत्येकी १,७२१ कोटी ७१ लाख रुपये
दोन्ही सरकारचे प्रत्येकी दुय्यम कर्ज : ५१० कोटी २३ लाख रुपये
राज्य सरकारकडून अतिरिक्त कर्ज : ८९८ कोटी १४ लाख रुपये
वित्तीय संस्थांचे कर्ज : ६,६९५ कोटी ८१ लाख रुपये
महापालिकेचा हिस्सा : ३२० कोटी ९६ लाख रुपये
सध्या शहरात दापोडी ते पिंपरी मार्गावर मेट्रो धावत असून, पिंपरी ते निगडी (भक्ती-शक्ती चौक) या ४.५ किलोमीटर लांबीच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आता हा नवा मार्ग मंजूर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आयटी हब, निवासी उपनगरे आणि चाकणमधील ऑटोमोबाईल औद्योगिक वसाहत थेट मेट्रो नेटवर्कने एकमेकांशी जोडली जाणार आहेत.