सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर : उजनी जलाशयाच्या पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदापूर तालुक्यातील माळवाडी परिसरात अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जिलेटिनच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याने उजनी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
उजनी जलाशयाच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आणि पार्श्वभूमीवर महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत माळवाडी परिसरात महसूल विभागाच्या पथकाने पाहणी केली असता वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी आढळून आल्या. पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित बोटी ताब्यात घेतल्या.
या बोटींचा पुन्हा अवैध वाळू उपशासाठी वापर होऊ नये, यासाठी त्या जिलेटिनच्या साहाय्याने जलाशयाच्या पात्रातच उद्ध्वस्त करण्यात आल्या. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारा लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि नायब तहसीलदार स्वाती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पांडुरंग कोळगे, माळवाडीचे मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, वैभव मुळे, भास्कर घोळवे, तसेच पोलीस पाटील अरुण कांबळे व सुनील राऊत यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उपशावर यापुढेही कारवाई सुरूच!
उजनी जलाशयातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
उजनी जलाशयाच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माळवाडी परिसरातील तीन बोटी उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाचा स्पष्ट संदेश मिळाला असून, आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






