कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल
पुणे : कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामानिमित्त (सेगमेंट लॉचिंग) या परिसरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. शुक्रवारपासून (दि.१९) तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
वाहतूक नियोजनासाठी कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज चौकातील राजस सोसायटीत पुलाचा वापर न करता शेजारील सेवा रस्त्याचा वापर करावा. राजस सोसायटी येथील पुलावरील वाहतूक कात्रज ते कोंढवा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. कात्रज तलावाकडून येणाऱ्या वाहनांनी राजस सोसायटी चौक, तसेच कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून सेवा रस्त्याने जावे.
दरम्यान, राजस सोसायटीकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांनी कपिल डेअरीकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. उड्डाणपुलाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
धाराशिवमध्ये भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्यू
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. BLO चे शासकीय काम पूर्ण करून परतत असताना चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत कनगरा (ता. धाराशिव) येथील रहिवासी तथा बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.






