सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेवाने आपला प्रखर प्रकोप दाखवायला सुरुवात केल्याने होरपळून निघालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज निसर्गाने सुखद धक्का दिला आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून असलेल्या उन्हाच्या चटक्यांनंतर दुपारी अडीचच्या सुमारास आभाळ भरून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला असला तरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी धावपळ उडाली.
उन्हाच्या काहिलीतून तात्पुरती सुटका
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशांच्या आसपास स्थिरावला होता. दुपारच्या वेळी नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झाले होते. मात्र, आज दुपारी अचानक वातावरणात नाट्यमय बदल झाला. काही वेळातच आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली आणि पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड व हिंजवडी परिसरात पावसाने हजेरी लावली. कडाक्याच्या उन्हातून या पावसामुळे तात्पुरता का होईना, पण सुखद दिलासा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भररस्त्यात दुचाकीस्वारांची कसरत
पावसाचा कोणताही अंदाज नसल्याने कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची, विशेषतः दुचाकीस्वारांची प्रचंड तारांबळ उडाली. अनेकांकडे छत्री किंवा रेनकोटची सोय नसल्याने मिळेल त्या आडोशाला लोक थांबताना दिसत होते. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावला होता. सखल भागांत पाणी साचल्याने पादचाऱ्यांचीही मोठी अडचण झाली.
शेती आणि आरोग्यावर परिणामाची शक्यता
वातावरणातील या अचानक बदलामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला, तरी या अवकाळी पावसामुळे बागायतदार आणि व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः आंबा आणि इतर उन्हाळी पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, तापमानात होणाऱ्या या सततच्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊन सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ
जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये आज अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. उन्हाळ कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने रंग बदलल्याने, शेतात साठवून ठेवलेला ‘लाल सोन्याचा’ ढीग (आरणी) प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.






