(फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सागर पवार याने आर्थिक मदत केल्याचे तर खूनाच्या नियोजनाची माहिती असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे मास्टर माईंड सोमनाथ गायकवाडसोबतच या खूनात सागर पवार देखील प्रमुख आरोपीच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. त्याआधी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या १८ आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. १६ आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तर दोन आरोपींना अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकाश जयंत कोमकर तसेच गणेश लक्ष्मण कोमकर यांच्या पोलीस कोठडीत कोर्टाने १५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. तर, बहिण संजीवनी कोमकर, मास्टर माईंड सोमनाथ गायकवाड आणि जयंत कोमकर यांच्या कोठडीत १६ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. मानगाव परिसरात एकाचवेळी अटक करण्यात आलेल्या अनिकेत दुधभाते, तुषार उर्फ आबा कदम व त्याच्या इतर १० जणांच्या कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच गुरूवारी अटक केलेल्या सागर पवार तसेच साहिल दळवी यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठड्यात (दि. १ सप्टेंबर) रविवारी रात्री वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. याखूनप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना अटक तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास केला जात आहे. कौटुंबिक वाद, संपत्ती तसेच टोळी युद्धातून हत्या झाल्याचे सांगितले जाते. यासोबत प्रमुख कारणांपैकी एक कारण निखील आखाडे याच्या हत्येचा बदला घेण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुरूवारी सागर पवार व साहिल दळवी या दोघांना अटक केली आहे. तपासात दळवी याने आर्थिक मदत केल्याचे तसेच त्याला या हत्येच्या नियोजनाची माहिती समोर आली आहे. तसेच, मध्यप्रदेशातून आरोपींनी हे पिस्तूल आणले होते असेही समोर आले आहे. ८ पिस्तूलांसह १३ काडतूसे जप्त केली आहेत.याबाबत आता अधिक तपास केला जात आहे. अधिकच्या चौकशीसाठी आरोपींच्या कोठडी देण्यात यावी अशी सरकारी पक्षाच्या वतीने केली होती. न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
वनराज आंदेकर हे नान पेठेमध्ये उभे होते. यावेळी आरोपींनी सुपारी देऊन मुलांना त्यांची हत्या करण्यासाठी पाठवले. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरुन मुलं आली. त्यांनी थेट वनराज यांच्यावर पिस्तुल रोखत गोळीबार केला. त्यानंतर वनराज व शिवम पळून जात होते. मात्र त्यांना गाठत कोयत्याने वार करण्यात आला. पाच फायरिंग आणि कोयत्याने वार करण्यात आले. यावेळी आरोपी गॅलरीमधून मारा त्याला सोडून नका…अशी चिथावणी देत असल्याचे फिर्यादीमध्ये सांगण्यात आले आहे.