पुणे महानगरपालिका (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: बेकायदा नळजोडांमुळे पाणी पुरवठ्याचे मोजमाप करणे अवघड होते. या नळजोडांमुळे साधारण २० टक्क्यांहून अधिक पाणी गळती होते. पुणे महापालिकेने मागील काही वर्षात बेकायदा नळजोडांना चाप लावण्यासाठी अशा नळजोडांवर कारवाई देखिल केली आहे. बेकायदा नळजोडांमुळे पाणी पुरवठ्याचे नियोजनही कोलमडत असल्याने पाणी उपलब्ध असतानाही अनेकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यासंदर्भात अनेक शहरांना आलेला अनुभव लक्षात घेता नव्याने होणार्या देवाची उरूळी फुरसुंगी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये तातडीने ‘समान पाणी पुरवठा’ योजना राबविण्याची गरज असल्याचे मत जाणकार अधिकारी व्यक्त करत आहेत.
देवाची उरूळी आणि फुरसुंंगी ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतू अद्यापही प्राथमिक सुविधा देण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडेच आहे. ही गावे वगळल्यानंतर नळजोड मिळावा यासाठी महापालिकेकडे एकही अर्ज आलेला नाही. बेकायदा नळजोडांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास महापालिका कारवाई करेल.
बेकायदा नळजोडांमुळे नुकतेच सुरू झालेली पाणी पुरवठा यंत्रणा कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला आहे. नगर परिषद स्थापनेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप या गावांना प्राथमिक सुविधांसाठी महापालिकेवरच अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेच्या कचरा डेपोमुळे जलस्त्रोत प्रदुषित झाल्याने महापालिका या परिसरात अद्यापही दररोज २०० टँकर पाणी पुरवठा करत आहे.
हेही वाचा: Supriya Sule: “… हा निवडणूक जुमला ठरू नये”; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला खोचक टोला
यंत्रणा नसल्याने गैरफायदा
देवाची उरूळी परिसरात काही ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचे काम करून घेण्यात आले आहे. परंतू देवाची उरूळी व फुरसुंगी परिसरातील अनेक भागात पाईपलाईनचे काम अद्याप व्हायचे आहे. सध्या ही दोन्ही गावे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नाहीत. येथे प्रशासक नेमण्यात आला आहे. येथील कामांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याने अनेकांचे फावले आहे. काही ठिकाणी टाकलेल्या पाईपलाईनमधून बेकायदा नळजोड देण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये आकारले जात आहेत. यामुळे पैसे देउन हवे तेवढे कनेक्शन घेण्यासाठी ठराविक वर्ग सरसावला आहे. रात्रीच्यावेळी बिनधास्त रस्ते खोदाईकरून बेकायदा टॅप मारण्याची कामे सुरू आहेत. बेकायदा टॅपमुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, अशी माहिती येथील सुजाण नागरिकांनी दिली.
हेही वाचा: दादांकडून खूप काही शिकण्यासारखंं; पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक
नळजोड तोडणीबाबतचा ‘एसएमएस’
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने व 9309445824 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.