
Maharashtra Drought 2026
३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जलसाठ्याचे नियोजन आणि वापराचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अमोल कोल्हे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत खडकवासला प्रकल्पात मृतसाठा, बाष्पीभवन आणि राखीव साठा वगळता सुमारे २० टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हा साठा सर्वसाधारण वर्षांच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी कमी आहे. परतीचा पाऊस न झाल्याने पाणी उपलब्धतेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा प्राधान्यक्रमानुसार वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
पवना, भामा आसखेड, चासकमान आणि नीरा खोरे प्रणालीतील प्रकल्पांमध्ये ९० ते ९५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी २० टक्के पाणीकपातीच्या अनुषंगाने नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. उपलब्ध साठ्याचा विचार करून रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी दिले जाणार आहे.
Maharashtra Drought: नीरा खोऱ्यात पाणीसाठ्याची घट; चार धरणांची आकडेवारी काय सांगते?
अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी महसूल, महावितरण, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. बेकायदा पाणीउपशासाठी वापरण्यात येणारे पंप आणि मोटारी जप्त केल्या जाणार आहेत. पाणीचोरी आढळल्यास संबंधितांचे वीजजोडही खंडित करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जातील.