
Manoj Jarange
Manoj Jarange Patil : राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या मदतीच्या रकमेवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सोमठाणा गडावरील रेणुका मातेचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना त्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचं अनुदान देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपये देणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्यासारखं असल्याची टीका त्यांनी केली.
दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अपुरी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचं अनुदान द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत ही शेतकऱ्यांचं लक्ष आंदोलन आणि मोर्चांपासून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना मदतीसाठी बँकांच्या दारात उभं राहावं लागणार असेल, तर ही परिस्थिती योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, सरकारच्या मदतीच्या घोषणेवर विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचं सांगत हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली जात आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मदत मिळणार, त्यासाठीचे निकष काय असतील आणि मदत कधी जमा होणार, याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.