आगीत उधळली जातात गुरं; दिवाळीत धानसर गावातली अनोखी प्रथा
पनवेल/ दिपक घरत : शहरीकरणाच्या कचाट्यात एकीकडे ग्रामीण भागात सण उत्सवाच्या काळात पूर्वी पाळण्यात येणाऱ्या प्रथा नष्ट होत असतानाच पनवेल पालिकेत समाविष्ठ धानसर गावातील ग्रामस्थ मात्र आपल्या प्रथा परंपरा अद्यापही सांभाळून असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी बळीप्रतिपदेच्या दिवशी गुर ढोरांना गावाच्या वेशीवर उधळवण्याची प्रथा ग्रामस्थांनी अद्यापही कायम ठेवली असून, शनिवारी ( ता. 2) देखील प्रथे प्रमाणे गुरा ढोरांना सजवून सजवून या प्रथेच पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे.एके काळी शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या धांनसर गावच झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरीकरणा मुळे गावाचं रुपड पालटल्याने शेती हा व्यवसाय गावातून जवळपास संपुष्टात आला आहे. परिणामी शेती कामा साठी पूर्वी जोपसल्या जाणाऱ्या गुरा ढोरांची संख्या कमी झाली आहे.असे असतानाही गावातील काही शेतकरी अद्यापही शेती टिकवून आपल्या प्रथा परंपरा पाळत आहेत.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात होती व त्या करीता जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैल जोडी सोबत गाई म्हशी पाळण्याची पद्धत आहे. दिवाळी दरम्यान येणाऱ्या बलिप्रतिपदा या दिवशी पहाटे लवकर उठून घरातील गुरु धोरांना अंघोळ घालून सजवण्याची व गावाच्या वेशीवर गवताच्या गंजिना आग लावून त्या वरून गुर उडवण्याची प्रथा पाळली जात होती.विशेषतः ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही प्रथा मोठ्या उत्साहाात पाहायला मिळत होती. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे शेती व्यवसाय कमी होत गेला त्यामुळे ही प्रथा कालांतराने कमी होत गेली. मात्र पनवेल ग्रामीण भागातील काही गावात आज देखील काही प्रमाणात ही प्रथा पाळण्यात येत आहे. पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील धांनसर गावातील स्थानिकांनी ही परंपरा अद्याप देखील जिवंत ठेवली आहे.
हेही वाचा-‘या’ जिल्ह्यात भाजपला विधानसभेची एकही जागा नाही ! कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी
मागील काही वर्षात प्राणी मित्रांकडून या प्रथे वर टीका केली जात आहे. या प्रथेमुळे गुरांना इजा होण्याची शक्यता असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे आहे.मात्र ही प्रथा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण आहे असं गावकऱ्याांचं म्हणणं आहे. गावाच्या वेशीवर वाळलेल्या गवताचा जाळ करून त्यावरून बैल उडवले जातात या प्रथे मागे सांगितल्या जाणाऱ्या शास्त्रीय करणानुसार भातशेतीची चिखलणी व लावणी झाल्यावर पावसाळ्यातील दोन अडीच महिने बैलांना काही काम नसते. बैल हिरवे गार गवत खाऊन घरातल्या गोठ्यांमध्ये असतात त्यामुळे त्यांच्या पायांना सतत ओलाव्यामुळे जीव जंतूचा संसर्ग होतो. काम नसल्याने काहीशा सुस्तावलेल्या बैलांना बळी प्रतिपदेला धूर व आगीवरुन उडवल्यामुळे त्यांच्या अंगावर पायांवर असलेले जीवजंतू नष्ट होतात तसेच धूर व आग यांच्याशी संपर्क आल्याने बैलांच्या मनात आग व धुराबद्दल असलेली भीती निघून जाते.
हेही वाचा-मालवणमध्ये शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग जोरात ! असंख्य मच्छिमारांनी हाती घेतली मशाल
दिवाळी संपली की लगेच शेतीची मशागत करण्यासाठी बैलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण होते.या वेळी प्रत्येक शेतकरी देखील बैलांच्या पुढे जाऊन स्वतः धुरात आणि आगीवरून जातो आणि त्याच्या मागे आपल्या बैलांना ओढत नेतो दर वर्षी शेतात राब राब राबणाऱ्या बैलांची ईडा पिडा टाळण्यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली ढोरं उडवण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गांवर असली तरी काही गावात आज देखील ही प्रथा उत्साहात साजरी केली जात आहे.