Photo Credit- Social Media
जमीर खलफे/ रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे जागावाटपामध्ये सिद्ध झाले आहे. भाजप या विधानसभेत 146 जागा लढत आहे.त्यामुळे हा पक्ष केवळ महायुतीमध्येच नव्हे तर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या जागांच्या तुलनेतही सर्वात जास्त जागा लढत आहे. मात्र या पक्षाला महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा मिळाली नाही आहे. तो जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्ष एकही जागा पक्षाला मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि यासंबंधी नाराजी काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गुहागरची जागा भाजपला मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत होती मात्र महायुतीच्या जागावाटपात गुहागरमधून शिंदे शिवसेनेचे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवर माजी आमदार डॉ. नातू निवडणूक लढविण्यास इच्छुक होते आणि ही जागा भाजपलाच मिळणार, अशी दाट शक्यता होती; मात्र वाटाघाटींमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाराज असलेल्या डॉ. नातू यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची स्पष्टोक्ती केली.”शिवसेनेकडे मातब्बर उमेदवार असताना दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊन तो आपला आहे हे समजायचे आणि त्यांचा प्रचार करायचा. भाजपला मात्र उमेदवारी द्यायची नाही. अशाने जिल्ह्यातून कमळ निशाणी हद्दपार झाली असली, तरी ती भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे” असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघ
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये गुहागर, रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि चिपळूण यांचा समावेश होतो. महायुतीमधील जागावाटपात गुहागर, रत्नागिरी , दापोली, राजापूर या जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्या आहेत. तर चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेला आहे. म्हणजे 5 पैकी 4 जागा शिंदे गटाला तर 1 जागा अजित पवार गटाकडे गेली आहे.
गुहागर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून राजेश बेंडल हे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. रत्नागिरी मतदारसंघातून शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत निवडणूक लढवत आहेत. दापोलीमधून शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर राजापूर मतदारसंघाकडून महायुती साठी शिंदे गटाकडून किरण सामंत निवडणूक लढत आहेत. आणि चिपळूण मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम हे निवडणूक लढवत आहेत. मुख्यत: शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या विधानसभेच्या लढती या अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. त्यामुळे कोणती शिवसेना जिल्ह्यात बाजी मारते हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.