
Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा
तीन शाळकरी मुलींच्या एक व्हिडिओनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. खांडपे-कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या त्या चिमुकल्या मुलींनी हातात मोबाईल घेऊन रिपोर्टरची भूमिका बजावली आणि सत्य समोर आणलं. तो व्हिडिओ वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर व्हायरल झाला. त्यानंतर या भागाचे आमदार महेंद्र थोरवेंनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकून सरकार किती जागरूक आहे? हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून राज्यातील अनेक पक्षांचे प्रवक्ते तुटून पडले होते. मुलींच्या भेटीसाठी रांग लागली होती. आज तोच व्हरायल रस्ता पुन्हा खड्यात हरवला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
खांडपे-कोंदिवडे रस्ता पुन्हा मृत्यूचा सापळा बनला. खड्डे, चिखल, पाणी, अपघाताला आमंत्रण, पण आता त्या रस्त्याकडे कोणी बघायला तयार नाही. हा रस्ता बीड जिल्हा परिषद गटात येतो. हा घारे बंधूंचा बालेकिल्ला समजला जातो. कर्जत पंचायत समितीच्या सभापती स्वतः नमीता चारे आहेत. व्हायरल व्हिडिओनंतर धावपळ करणारे आमदार आणि आपलाच बालेकिल्ला म्हणणारे घारे यांच्याकडून काहीही बोलले जात नाही, याविरोधात पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
पोलीस मित्र संघटनेने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली, सर्व बांधकाम विभागांना जिल्हा परिषद, बांधकाम, सार्वजनिक एम. एम. आर. डी.ए. आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या सगळ्यांना निवेदने दिली. गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, नाहीतर बाप्पाला मांडीवर घेऊन खड्डुचात बसून आंदोलन करू नदी पात्रात बाप्पाला घेऊन जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला. सोमवारी श्रीराम पुलावर पोलीस मित्र संघटना गणपती बाप्पाला मांडीवर घेऊन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करणार आहे.
गणपती उत्सव अवघ्या ८-१० दिवसांवर आला आहे. पण एकही विभाग कामाला लागायला तयार नाही. राजिप बांधकाम विभागाने थोडीफार सुरुवात केली आहे. पण तेही समाधानकारक नाही आणि त्यामुळे पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. – रमेश कदम, राज्य उपाध्यक्ष, पोलीस मित्र संघटना