
Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!
कर्जत येथे होणाऱ्या टोरंट प्रकल्पासाठी वन विभागाची ६४० हेक्टर जमीन दिली जाणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी वन जमीन देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्काळ तेथील ठेकेदाराने झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. टोरंट प्रकल्पाच्या कामासाठी थेट झाडे कापण्यापासूनची मोहीम सुरू झाल्याने कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
वन विभागाच्या मनमानी कारभाराबद्दल जाब विचारण्यासाठी कर्जत पर्यावरण बचाव समितीने पाली तर्फे कोतवाल खलाटी भागातील झाडे तोडण्यापासून रोखण्यात यावी यासाठी झाडांना मिठी मारण्याचे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे चिपको आंदोलन कर्जत पर्यावरण बचाव समितीने जाहीर केल्यानंतर तत्काळ कर्जत तालुक्यातील असंख्य पर्यावरणप्रेमी तयार झाले असून त्यात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी, प्रकल्पग्रस्त असे अनेक प्रकाराचे लोक सहभागी होणार आहेत,
पाली तर्फे कोतवाल खलाटी या भागात चिपको आंदोलन केले जाणार आहे. समन्वयक ॲड कैलास मोरे यांच्यासह सचिन गायकवाड, अक्षय गायकवाड, राहुल गायकवाड, राजेश वेहेले, सतिश बोराडे, जगदीश दगडे, प्रणेश यादव, तानाजी तुरड, दिनेश आढाव, किरण राणे, हरेश जानु सोनावळे, एकनाथ खडेकर, गणेश मसणे, पंकेश जाधव, महेश आढाव, स्विटी बार्शी, अजय कराळे, मिलिंद लाड, जयेश मसणे, ऋषिकेश भगत, जगदीश माळी, जितेंद्र गवळी मानिवली, शरद हजारे, प्रदीप ढोले, संजय देशमुख, मयूर आंग्रे, विनोद गजानन दळवी-अवसरे, अर्जुन माळी, महेंद्र भोईर, पंकज गायकर, प्रविण राणे हे सहभागी होणार आहेत.
केवळ कागदी अधिसूचना निघाल्यावरून वन विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे कापण्याची परवानगी कशी दिली? ६४० हेक्टरवर लाखो झाडे असताना ही संख्या कमी दाखवून निसर्गाचा बळी दिला जात आहे. आम्ही एकही झाड तोडू देणार नाही, यासाठी झाडांना मिठी मारून ‘चिपको आंदोलन’ करू! – ॲड. कैलास मोरे, समन्वयक, कर्जत पर्यावरण बचाव समिती