
साई डोंगरावरील 150 एकर वनजमिनीवर आदिवासींचा दावा; हक्कासाठी लढ्याची घोषणा
पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत काही वर्षापूर्वी निर्माण झाली आहे.पूर्वी पोटल ग्रामपंचायती मध्ये असलेल्या साई डोंगर भागातील दळी वन जमिनीवरील पाली गावाच्या महसूल क्षेत्रात तीन आदिवासी वाड्या आहेत.या आदिवासी वाड्यांमध्ये पाली कातकरी वाडी,आंब्याची वाडी आणि मोहमाळवाडी अशा तीन आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे लोकांची वहिवाट होती.पुढे मोहमाळ वाडी आणि आंब्याची वाडी येथील आदिवासी लोकांना सर्वे नंबर 22 मधील 35 एकर जमिनीवर वन हक्क कायदे वन विभागाने मंजूर केले.त्या वन हक्क कायद्याने मिळालेल्या वन जमिनीवर ही आदिवासी लोक आंबे लागवड करून उदरनिर्वाह करीत आहेत.तेथील दळी भूखंड येथील 24 आदिवासी लोकांना वन हक्क कायद्याच्या आधारे मिळाले आहेत.त्या जमिनीत भाजीपाला शेती पावसाळ्यात बहुसंख्येने केली जात आहे. त्या शेती मधून पिकणारा भाजीपाला येथील आदिवासी शेतकरी कर्जत कडाव आणि पाली भालिवडी या भागात जाऊन विक्री करतात. त्यामुळे वन हक्क कायद्यातून मिळालेली जमीन या आदिवासी शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरली आहे.
परंतु याच भागातील साई डोंगर येथील 150 एकर जमीन आदिवासी लोकांना अद्याप मिळालेली नाही.वन हक्क कायद्यातून त्या जमिनी मिळाव्यात यासाठी पाली कातकरी वाडी,मोहमाळ वाडी आणि आंब्याची वाडी मधील आदिवासी शेतकरी अनेक वर लढा देत आहेत. त्यात या आदिवासी लोकांना अद्याप यश आले नसून आता हा लढा अधिक वेगवान करण्याचं निर्णय तिन्ही आदिवासी वाड्यांमध्ये आदिवासी लोकांनी घेतला आहे.आंब्याची वाडी मधील 55 कुटुंब,मोहमाळ वाडी मधील 22 कुटुंब आणि पाली कातकरी वाडी मधील 35 कुटुंब यांना त्या 150 एकर दळी जमिनीचे पट्टे वन हक्क कायद्याने मिळावेत अशी मागणी पुढे आली आहे. वन विभागाच्या दळी जमिनीवर तेथील आदिवासी लोकांचा अधिकार आणि हक्क आहे.पण शासनाने अद्याप वन कायद्याच्या आधारे ही जमीन पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत मधील रहिवाशांना दिलेली नाही.त्यामुळे येथील आदिवासी संतप्त असून येथील जमिनीवर या तीन वाड्यांमधील आदिवासी लोकांची वहिवाट आहे.त्याचवेळी हे सर्व आदिवासी प्रमुखाने पावसाळ्यात भाजीपाला शेती तसेच नागली, वरी यांची शेती करून उत्पादन घेत आहेत.
दरम्यान,साई डोंगर मधील १५० एकर दळी जमिनीवर टोरंट प्रकल्प उभारला जात असल्याने आदिवासी लोकांची जमीन आणि रोजगार हिरावला जात आहे.याबाबत आदिवासी लोक आक्रमक झाले असून तेथील एकत्रित ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हरी जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.ही जमीन आमच्या तीन वाड्यांमधील आदिवासी लोकांची असल्याने जमीन आम्हाला मिळायची हवी यासाठी लढा ऊभारण्याची तयारी आदिवासी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.