Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
म्हसळा हा कोकणातील ‘पर्जन्यबहुल तालुका’ म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी ४ ते ४.५ हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाचे आगमन उशिरा होणे, काही काळातच पावसाच्या विश्रांतीचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर झाल्याचे चित्र आहे. यंदा पावसाची नोंद ३६९० मिमी झाली असली तरीही त्यात सातत्य नसल्याने भात, नाचणी, वरी या खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. (फोटो सौजन्य – AI Created)
अनेक शेतक-यांच्या हातात अपेक्षित उत्पादन येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच माकडे, रानडुकरे आणि अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी खरीप हंगाम हा वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असतो. पिकांची वाढ अपेक्षित न होणे, उत्पादन घटण्याची शक्यता आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसावर अवलंबून असलेल्या ग्रामीण शेती व्यवस्थेत हवामानातील अनिश्चितता आता शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात भरलेले पाणीसाठे, विहिरी, तलाव आणि नैसर्गिक जलस्रोत यांची स्थिती आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना चिंता वाटू लागली आहे. उन्हाची तीव्रता अशीच वाढत राहिल्यास पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याकडे प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
एकीकडे पिकांना पाण्याची गरज असताना दुसरीकडे अचानक वादळी पाऊस किया जोरदार सरी कोसळल्यास हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतक-यांना सतावत आहे. शेतकरी पावसाची आशा करतात, पण त्याच वेळी अवकाळी किंवा वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये, अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे पाऊस पडला तरी चिंता आणि पाऊस थांबला तरी चिंता अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्थिती तपासणे, शेतीच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे आणि आवश्यक उपाययोजना वेळेत राबविणे गरजेचे आहे. हवामानविषयक अधिकृत अंदाज नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
एकूणच, ऑक्टोबर हिटचा वाढता तडाखा, खरीप पिकांवरील संकट, संभाव्य पाणीटंचाई आणि वादळी पावसाची धास्ती यामुळे म्हसळा तालुक्यातील नागरिक व शेतकरी चिंतेच्या वातावरणात आहेत. निसर्गाच्या बदलत्या चक्राचा सामना करताना आणि या संकटातून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांचे लक्ष हवामानातील बदल आणि प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.






