रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ऐतिहासिक अवचितगडावर इतिहासाचा एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला आहे. सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत, तब्बल ६०० ते ७०० फूट खोल दरीत शतकांपासून दडलेल्या दोन शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढण्यात इतिहासप्रेमींना यश आले आहे. शिवशंभू प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक यांच्या संयुक्त पथकाने ही अत्यंत खडतर आणि थरारक मोहीम फत्ते केली असून यामुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली आहे.
दुर्गप्रेमींच्या जिद्दीला आलेले यश
गेली १५ वर्षे अवचितगडाच्या संवर्धनासाठी आणि स्वच्छता मोहिमेसाठी झटणाऱ्या शिवशंभू प्रतिष्ठानच्या जिद्दीला या निमित्ताने मोठे यश आले आहे. या संस्थेने यापूर्वीही गड परिसरातील तीन ऐतिहासिक तोफांचा शोध लावून त्यांचे जतन केले होते. त्याच वेळी परिसरात आणखी काही तोफा गाडल्या गेल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार दुर्गप्रेमींनी सातत्याने शोध मोहीम सुरू ठेवली होती.
अथक परिश्रम आणि शिवप्रेमींचा जल्लोष
दाट जंगल, निसरडे उतार आणि खोल दरी अशा कठीण भौगोलिक परिस्थितीवर मात करत २१ जून रोजी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पथकातील सदस्यांनी जीवाची पर्वा न करता दोरखंड आणि विशेष साधनांच्या मदतीने या अजस्त्र तोफांना अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गडावर वर आणले. तोफा गडावर पोहोचताच ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत आणि भंडारा उधळून शिवप्रेमींनी जल्लोष केला.
छत्रपती शिवरायांनी रचला होता अभंग; तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अभंग उपलब्ध
अवचितगडाचा जिवंत इतिहास आणि आकर्षण
हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यराज्यकालीन इतिहासाचा एक भक्कम आणि जिवंत साक्षीदार मानला जातो. गडावरील सात टाक्यांचा समूह, दुर्मिळ द्वादशी तलाव आणि अनेक युद्धे पचवून आजही दिमाखात भक्कमपणे उभा असलेला गडाचा ‘महादरवाजा’ हे या गडाचे मुख्य आकर्षण आहे. या नवीन शोधामुळे अवचितगडाच्या ऐतिहासिक वैभवात आता आणखी मोठी भर पडली आहे.






